*समता सैनिक दलाचे आंदोलन, खड्ड्यात बेशरमचे झाड लावून केला प्रशासनाचा निषेध*
मागील १० वर्षांपासून नागरिक भोगताहेत नरक यातना
*प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप*
वर्धा:- सिंदी मेघे,बहुजन नगर ते थुल-ले-आऊट या विक्रमशीला नगराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठी खड्डे पडलेली आहेत. मागील १० वर्षांपासून या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या मार्गाच्या डांबरीकरणाकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांकडून व या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशासह वाहन चालकांमधून होत आहे. त्यामुळे समता सैनिक दल शाखा भीमवाडीच्या वतीने समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या नेतृत्वात खड्डय़ात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
सिंदी मेघे, बहुजन नगर ते थुल-ले-आऊटकडे जाणाऱ्या या रस्त्यावर जीवघेणी खड्डे पडलेली आहेत. या रस्त्यावरुन मार्गक्रमण करीत असतांना नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. ही खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत.
विक्रमशीला नगराकडे जाणारा हा रस्ता अरूंद व आजुबाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे उगवली असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला जणू पुराचे स्वरूप प्राप्त होते.त्यामुळे रस्त्याला पडलेलली मोठ-मोठी खड्डे व साचलेल्या पाण्यातून वाट कशी काढावी असा प्रश्न येथील नागरिक व वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे.
पाण्यामुळे खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अनेक वाहन चालक घसरून पडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
नागरिकांना जाणे-येणे करण्यासाठी हाच मुख्य रस्ता सोयीचा आहे. परंतु पाणी भरल्या खोल खड्ड्यातून वाट काढतांना येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते. दुचाकी,चारचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गाने नेहमी वाळू व गीट्टी भरलेली अवजड वाहने चालत असल्यामुळे रस्त्याची चाळणी झाली आहे.
रस्त्याची ईतकी दुर्दशा होऊनही बांधकाम विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असतोष खदखदत असून त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी रस्त्याची दुरूस्ती करावी व अवागमन करण्यासाठी आवश्यक असलेल्या २० फुट रुंदीच्या रस्त्याचे तातडीने बांधकाम करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
त्यामुळे समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दल वार्ड शाखा भीमवाडी यांच्या सहकार्याने आसपासच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून बेशरमची झाडे खड्ड्यात लावून आंदोलन केले.
यावेळी समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्शल रमेश निमसडकर, समता सैनिक दलाचे जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, धर्मपाल कांबळे, दिलीप वैद्य, विजय डंभारे,रोशन गायकवाड, अक्षय घुसे,मधुर येसनकर, अशोक ताकसांडे, महासचिव स्वप्नील कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत, गौतम देशभ्रतार, प्रतिक मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.