*दुकानाच्या छताचे टीन वाकवून केले हजारोचा माल लंपास*
*मुकेश चौधरी प्रतिनिधि*
आर्वी:– वर्धा जिल्यातील आर्वी शहरात दुकानात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. छताचे टीन वाकवून व पीओपी तोडून दुकानातील एक लाख ४९ हजार ४१ रुपये किंमतेचे २० मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. शुक्रवार ता.२५ ते रविवार ता.२७ दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी या धाडसी चोरीने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
चोरट्यांनी शहराच्या मध्यभागी शिवाजी चौकात असलेल्या सिध्देश मोबाईल शॉपीवरील छताचे टीन गटांमधून काढून वाकविले आणि त्या खाली असलेले पीओपीचे छत तोडून आत प्रवेश केला. दुकानातील डब्यांमध्ये असलेले विविध कंपनीचे २० मोबाईल लंपास केले. दुकानात सिसिटिव्ही कॅमेरे आहेत. मात्र, डाटा सेव्ह झाला नसल्याने तेही निरुपयोगी ठरले.
शुक्रवारी ता.२५ रात्री दुकान बंद करून दुकान मालक देशमुख व नोकर घरी निघून गेले. शनिवारी ता.२५ दुकान बंद होते. रविवारी ता.२७ सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास देशमुख यांनी दुकान उघडले असता त्यांना छत तुटलेले दिसले आणि मोबाईलचे खाली डब्बे टेबलवर पडून होते. त्यांनी याची तक्रार येथील पोलिसात केली. प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांनी तक्रारीची दखल घेत तातडीने घटनास्थळाला भेट दिली. वर्धेच्या ठसे तज्ञांना पाचरण करून ठसे घेतले आणि अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
बंदोबस्ताच्या ठिकाणी झाली चोरी. शहराच्या मध्यभागी व पोलिस स्टेशनपासून अवघ्या एक फर्लांगांवर ही शॉपी असून शिवाजी चौकात सतत बंदोबस्त राहतो. पोलिसांची गस्तसुद्धा याच ठिकाणावरून सुरू होते. शिवाय या मार्गाने रात्रभर वाहतूक सुरू असते. असे असताना चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.