*विदर्भवादी संघटनानी केली नागपूर कराराची होळी*
*पल्लवी मेश्राम*
नागपुर:-विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी विदर्भात सर्वत्र नागपूर कराराची होळी करण्यात आली. वेगळ्या राज्यासाठी एक शतकाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असले तरी, अद्याप यश आलेले नाही. तत्कालीन राज्यकर्त्यांनी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार केला. त्यानंतर १ मे १९६० रोजी विदर्भासह महाराष्ट्राची निर्मिती झाली. करारातील अकरापैकी एकाही कलमाचे पालन झालेले नाही. उलट विदर्भाचे शोषण करण्यात येत आहे. त्यामुळे २८ तारखेला गावोगावी नागपूर कराराची होळी करण्यात आली असल्याचे समितीने जाहीर केले.
विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के नोकऱ्या नाहीत, उच्चपदाच्या नोकऱ्याही नाहीत, चार लाख नोकऱ्या अन्य भागात गेल्या. विदर्भाला २३ टक्के निधीही दिला नाही, ७५ हजार कोटी रुपये सिंचनाचे आणि ५० हजार कोटी रुपये रस्त्याचे अन्य भागात पळवले. गोसेखुर्दसारखी १३१ धरणे तीन दशकांत पूर्ण झाली नाही. विदर्भातील तरुणांचा रोजगारांचा प्रश्न, सिंचन आणि विकासाचे प्रश्न कायम आहेत. या सर्व प्रश्नांना वेगळे राज्य हेच एकमेव उत्तर असल्याचे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी म्हटले आहे.
आंदोलनात विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वामनराव चटप, रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, मुकेश मासुरकर, विष्णू आष्टीकर, अरुण केदार, धनंजय धार्मिक, सुयोग निलदावार, सरोज काशीकर, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, सुनील वडस्कर, जी. एस. ख्वाजा, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, धर्मराज रेवतकर आदींनी केले आहे.