राकेश टिकैत

एमए, एलएलबी नंतर पोलीस इन्स्पेक्टर आणि आता नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणारे नेते म्हणजे राकेश टिकैत. राकेश टिकैत यांचा पूर्व इतिहास काय आहे? चला जाणून घेऊया.

राकेश टिकैत

 

सिद्धांत

मुंबई दि: २९ सप्टेंबर २०२१: राकेश टिकैत यांचा जन्म ४ जून १९६९ रोजी उत्तरप्रदेश येथील मुजफ्फरनगर येथे झाला होता. त्यांचे वडील महेंद्र सिंग टिकैत हे भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेचे संस्थापक होते. ही संघटना आजच्या घडीला शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यात आघाडीवर असते.

राकेश टिकैत यांनी मेरठ युनिव्हर्सिटी मधून एमए, एलएलबी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर १९९२ मध्ये दिल्ली पोलिसमध्ये कॉन्स्टेबल पदावर नोकरीला लागले. पुढे बढती मिळवत सब-इन्स्पेक्टर पदापर्यंत जाऊन पोहचले. १९९३ -९४ मध्ये त्यांचे वडील स्वर्गीय महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीतील लाल किल्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी त्याकाळच्या केंद्र सरकारकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता. एका बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे वडील आणि नातेवाईक आणि दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरीवर मिळालेला आदेश,अश्या द्विधा मनस्थिती राकेश टिकैत सापडले होते. 

अखेर त्यांनी पोलिसांच्या नोकरीला रामराम ठोकला आणि भारतीय किसान युनियन मध्ये सामील झाले. आजारपणामुळे वडील महेंद्र सिंग टिकैत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांनी भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते म्हणून काम करायला सुरुवात केली.

७ सप्टेंबर २०२० रोजी भाजपप्रणित केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे लोकसभेत पास केले. या कायद्या अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करणे, कृषी उत्पादनाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीतील अडथळे दूर करणे,आपल्या पिकासाठी शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांशी करार करता येईल. यांसारखे नियम लागू करण्यात आले. पण APMC बाहेर विक्री झाल्यास ‘बाजार शुल्क’ न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होईल, किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येईल,अनेक लहान-लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात खासगी व्यावसायिक रस दाखवतील का? शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किंमत मिळण्याची शक्यता आहे. अश्या आक्षेपांसह देशभरातल्या अनेक शेतकरी संघटनांनी ह्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. राकेश टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय किसान युनियन ही संघटना आघाडीवर होती.

राकेश टिकैत किसान महापंचायतमध्ये भाषण करताना

उच्च-शिक्षित असल्याने राकेश टिकैत आंदोलन करताना धरणे- प्रदर्शन करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ भावनिक नाही तर व्यावहारिक विचार करतात. त्यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. हरिद्वार ते दिल्ली मधील किसान क्रांती यात्रा, गाझीपूर बॉर्डरवरील शेतकऱ्यांचे धरणे,  मुजफ्फरनगर येथील महापंचायत यासारख्या आदोंलनात त्यांचा पुढाकार होता. आपली मत मांडण्यासाठी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीमुळे आंदोलनाला हिसंक वळण लागले होते. यावेळी राकेश टिकैत यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून एफआयर दाखल करण्यात आली होती. आपल्या कारकिर्दीत आजवर राकेश टिकैत यांना ४४ वेळा तुरुंगवास भोगावा लागला आहे. आजवर शेतकरी आणि केंद्र सरकार यामधील कृषी कायद्या संदर्भात झालेल्या ११ वाटाघाटीच्या फेऱ्यांमध्ये राकेश टिकैत यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.

२०१९ च्या निवडणुकीत आपण भाजपाला मत दिल्याचे राकेश टिकैत यांनी जाहीरपणे मान्य केलं होते. आज ते शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी १० वर्षे आंदोलन करायला लागले, स्वतःचा जीव द्यावा लागला तरी तयार असल्याचे आपल्या भाषणातून सांगतात. देशातल्या मीडियाला धारेवर धरत जर इथून पुढे सरकारच्या दबावाखाली येत शेतकऱ्यांची बाजू प्रामाणिकपणे न मांडल्यास त्यांच्या विरोधात लढा उभारण्याचा आवाहन राकेश टिकैत यांनी अलीकडेच दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here