बेरोजगार…

बेकारीने कहर केला

तू सांग कधी बोलणार

तूच तुझ्या हक्कासाठी 

तोंड कधी खोलणार…॥धृ॥

 

भूकेचं तुला भान नाही

रोजगाराचा ताण नाही

दिड जिबी डाट्यापुढं

गरिबीची रे जाण नाही

तू घाव रिकामपणाचे

सांग कसे झेलणार ….॥१॥

 

जगण्यास नौकरी नाही

लग्नास छोकरी नाही

आई बापाच्या कष्टाची

थोडी तुला फिकीर नाही

तू आयुष्याचे मोल त्यांच्या

सांग कसे तोलणार …॥२॥

 

हाती तुझ्या काम नाही

अंगालाही घाम नाही

सरकारी तिजोरीमध्ये

तुझ्यासाठी दाम नाही

तू पुढार्‍याच्या तालावर

सांग किती डोलणार ..॥३॥

 

भविष्याची चिंता नाही

अन्यायाची खंत नाही

घरादारासाठी तुजला

थोडी सुद्धा उसंत नाही

तू संसाराचे ओझे गड्या

सांग कसे पेलणार ..॥४॥

 

रोजगारांची हमी नाही

बेरोजगारांची कमी नाही

बेकारीच्या वणव्यामध्ये 

जळणारांची कमी नाही

तू चटके महागाईचे

सांग किती सोसणार ..॥५॥

 

कवी – मारुती खुडे गुरुजी.

श्रीक्षेत्र माहुर.जि.नांदेड

——————————

संकलन – गोपाल नाईक

युवा पत्रकार नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here