नागपुरात ड्रग तस्कर करीम लाला जेरबंद.
नागपूरातील कुख्यात तडीपार गुंड करीम लाला याच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन लाख सात हजाराची एमडी जप्त करण्यात आली.
प्रतिनिधी
नागपूर :- शहरातील कुख्यात तडीपार गुंड करीम लाला याच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन लाख सात हजाराची एमडी जप्त करण्यात आली.
मानकापूरच्या नागसेन सोसायटीत राहणारा अब्दुल करीम अजीज शेख (वय ३१) हा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, दंगा, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, घातक शस्त्रे बाळगणे असे १९ गंभीर गुन्हे दाखल असून, तो गुन्हेगारी वर्तुळात करीम लाला नावाने कुख्यात आहे. त्याला तडीपारही करण्यात आले आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असलेल्या करीम लालाला अमली पदार्थांचेही व्यसन आहे. जुगार आणि एमडीची लत असलेला करीम गेल्या काही दिवसापासून एमडी तस्करांच्या संपर्कात आल्याचीही चर्चा होती. त्यामुळे गुन्हे शाखेने त्याच्यावर नजर रोखली होती. एमडीची मोठी खेप घेऊन करीम लाला त्याच्या साथीदारांसह सोमवारी रात्री गिट्टीखदानमध्ये येणार असल्याची टीप मिळाल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले. पोलिसांनी पोलीस लाईन टाकळी परिसरात जाळे पसरवले. ठरल्यानुसार रात्री १०.३० च्या सुमारास करीम नजरेस पडताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद करून झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ ग्रॅम ७२ मिलीग्रॅम एमडी पावडर आढळले. बाजारपेठेनुसार आजघडीला त्याची किंमत २ लाख ६ हजार ८८० रुपये आहे. त्याला गुन्हे शाखेत नेऊन त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३० ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला.