मांजा काढण्याकरिता गेला, पण लागला विद्युत तारांला हात.
विद्युत प्रवाहित तारांला हात लागताच तरुणाचा झाला मृत्यू.
प्रतिनिधी
वर्धा :- प्रवाहित विद्युत वाहिनीवर अडकलेला पतंगच्या मांजा काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पिपरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
सचिन नारायण डुकरे वय 38 असे विजेचा धक्काने मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सचिन हा परिसरात केबल वाहिनीचे काम करीत होता. याच कामादरम्यान त्याला येथील 11 केव्हीच्या वीजतारांवर नायलॉन मांजा दिसला. तो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. यात त्याचा स्पर्श वीज तारांना झाला. यात त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य राजेश राजूरकर यांनी पोलिसांसह महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी सरपंच अजय गौळकर यांच्यासह परिसराच्या सदस्य भारती गडेकर यांची उपस्थिती होती. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी येथे एकच गर्दी केली होती. मनमिळावू असलेल्या सचिनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरांच्या छताजवळून गेलेल्या तारांना सुरक्षा द्या.
ही दृदवी घटना घडली त्या घराच्या छतापासूनच हाय पॉवर 11 केव्हीची लाइन गेली आहे. या घरातील मंडळी नेहमीच छतावर जातात. यावेळी येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथून गेलेल्या तारांपासून सुरक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यास आणखी दुसरी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.