स्पॉटलाईट: आम्हीही लाच घेतो
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
या पृथ्वीतलावरती सर्वात सुंदर प्राणी म्हणून स्त्री व पुरूषाची निसर्गाने निर्मिती केलेली आहे. किती आनंदाची गोष्ट आहे पण खरं सांगायचं म्हटलं तर खरच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की, अनेक जन्मानंतर एवढा सुंदर असा जन्म आम्हाला मिळाला आहे. आणि या मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी व निसर्गाचे धन्यवाद मानण्यासाठी सर्वात प्रथम चांगले कर्म करणे तेवढेच आवश्यक आहे व असेच चांगले कर्म करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. पण, याचा मात्र कुठेतरी आपल्याला विसर पडतो आहे हे शंभर टक्के खरे आहे. वास्तविक पाहता जीवन जगताना प्रत्येक माणसाच्या तीन मुलभूत गरजा असतात अन्न, वस्त्र आणि निवारा व सोबतीला दोन पैशाची गरज सुध्दा पडत असते कारण, आजकालच्या जमान्यात खूप महागाई वाढलेली आहे काहींच्या घरची तर..चूल पेटत नाही व काही लोकांच्या हाताला नीट काम सुध्दा मिळत नाही त्यामुळे असे कितीतरी लोक उपाशी पोटी निजत असतात असे अनेक जिवंत अनुभव, चित्र, उदाहरण नेहमीच बघायला मिळत असतात. त्यातच मात्र काही जणांच्या पाशी चांगली नौकरी, पद, घरदार,बंगला,गाडी, भरपूर पैसा,अडका असताना सुद्धा त्यांच्या मनाला पाहिजे त्या प्रकारचा समाधान होत नाही अशा लोकांची समाजामध्ये कमी नाही अशा लोकांना खरच काय म्हणावे..? हा एक भारी प्रश्न आहे.
अशा लोकांपेक्षा बळीराजा, गोर, गरीब,दिव्यांग, मोलमजुरी करणारे लोक कितीतरी पटीने चांगले असतात निदान त्यांच्याकडे भरपूर पैसा, अडका घर, बंगला,गाडी नसेल तरी त्यांच्या मनामध्ये सदैव समाधान असतो व प्रामाणिकपणे जगण्याची त्यांच्यात कला असते असे लोक कधीही चुकीचे पाऊल उचलत नाही व आपले जीवन मातीमोल करीत नाही. कारण ते, स्वाभिमानी व कष्टकरी, दयाळू, मायाळू असतात पण दुःख एका गोष्टींचा वाटतो की, आजकाल त्याच लोकांची मात्र समाजामध्ये कदर केली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे वास्तव सत्य परिस्थिती आहे आपण कोणीही नाकारू शकत नाही.
त्याच प्रमाणे याच समाजामध्ये राहणारे असे काही लोक असतात की, खूप शिकून, सावरून सरकारी नौकरीच्या शोधात फिरत असतात वेळ आली तर..त्यांचे संपूर्ण आयुष्यही निघून जाते पण त्यांना सरकारी नौकरी लागत नाही एवढे कठीण होऊन बसलेले आहे ही सत्य परिस्थिती व वास्तव आजही आपण सर्वजण चांगल्याप्रकारे जानूनच आहोत यात काही शंका नाही आणि अशा प्रामाणिक व परिस्थितीतून बाहेर पडणाऱ्या लोकांचे मात्र जीवन अंधारात असते त्यांच्या जीवनाला कधीही नवी दिशा मिळत नाही व केव्हा मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजेच,याच समाजामध्ये राहणाऱ्या अशा काही लोकांच्या बाबतीत दररोज टी.व्ही.च्या किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारच्या बातम्या वाचायला, ऐकायला मिळत असतात वाचून आणि बघून मनामध्ये त्यांच्या प्रती एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होत असतो. त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्यासाठी इच्छा होत नाही त्यांचे नाव जरी ऐकायला मिळाले तरी मन खराब होऊन जाते अशा लालची लोकांना काय म्हणावे..? म्हणतात ना की विनाश कालीन विपरीत बुद्धी! च्या पायी स्वतः च्या जीवनाला कलंकित करून सोडतात असे मुके प्राणी सुद्धा करीत नाही हे सत्य आहे.असेच काही लोक सरकारी नौकरी वर चांगल्या मोठ्या पदावर ती असताना सुद्धा,त्यांना पदाविषयी काही वाटत नाही व स्वतः च्या जीवना विषयी तर..काहीच वाटत नाही अशा लोकांना काय म्हणावे..?
सर्वांत महत्वाची गोष्ट अशी की, काही लोक लाच घेऊन तर मोकळे होतातच तेवढेच बदनाम सुध्दा होतात.पण, लाच घेतेवेळी मात्र मागचा, पुढचा विचार करीत नाही एवढेच नाही तर आपण कोणत्या परिस्थितीतून एवढ्या मोठ्या पदावर ती पोहोचलो आहोत किंवा आपल्याला कोणी शिकवले,कशा प्रकारे दिवस काढून शिकवले, जन्म देऊन लहान्याचे मोठे कसे केले एवढा मोठा पदाधिकारी बणवले या,साऱ्या गोष्टींचा विचार न करता प्रामाणिकपणे नौकरी करायची सोडून, पदभार सांभाळायचे सोडून शासनाकडून भरपूर पगार मिळताना सुध्दा लाच घेण्याची लालच मनामध्ये वाढवत असतात. अशा लालची लोकांचे कारनामे या समाजामध्ये, देशामध्ये कमी नाहीत. कित्येक गोर,गरीबांना, दिव्यांगांना,विधवा भगिनींना, साध्या भोळ्या, भाबड्या लोकांना बळीराजाला एक सही करण्यासाठी पाचशे रुपया पासून ते, हजारांपर्यंत लाच मागतात असे, काम करण्यासाठी खरच शासन त्यांना नौकरी देते का..?
क्षेत्र मग कोणताही असो,जी कर्मचारी व्यक्ती काम करीत आहे त्यांनी आपल्यात माणुसकी ठेवून आपल्याला मिळालेल्या पदवीची अब्रू राखून नि: स्वार्थ भावनेने काम करायचे सोडून आपली जबाबदारी कोणती आहे याचे भान ठेवायचे सोडून लाच मागण्याची इच्छा निर्माण करीत आहे. यासाठीच शासन वेतनावर वेतन देते का..? गरीबांना लुटून,आपली मनमानी करून खिसे भरण्यासाठी..? असे, काही लालची लोक कित्येक लोकांची हाय घेऊन एक दिवस नंतर सापडत असतात व बदनामीच्या दारात प्रवेश करतात. लाच देणारे व घेणारे यांना खरच काय म्हणावे..? आपल्या मस्तकावर ती कलंक लावून जगत असतात अशाच लोकांच्या वागणुकीमुळे आजकाल भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. व कलियुग पेटत आहे.
अशाच लोकांच्या पायी देशाची प्रगती होत नाही व आजची भावी पिढी चांगले कार्य करण्याची इच्छा मनामध्ये ठेवत नाही तर उलट ते वेगळे वागतात आणि आज आपण सर्वजण त्यांनाच दोष देत फिरत असतो खरा दोष तर..त्या लालची लोकांचा आहे समाजाला येणाऱ्या भावी पिढीला काय चागले असते हे सांगायचे सोडून आपणच नको त्या मार्गाने जात असतात म्हणूनच तर..कलियुगाने सीमा गाठलेली आहे.
यामध्येच एक गोष्ट खरी आहे ती म्हणजेच की, कोणतेही आईवडील आपल्या मुलांना, मुलींना मोठ्या कष्टाने शिकवून त्यांच्यात सारेच स्वप्न बघत असतात आपले जीवन त्यांच्यात धन्य मानत असतात, कशाचीही अपेक्षा करीत नाही पण, आजकाल असं होतं की त्यांनी बघितलेल्या स्वप्नांचा पालापाचोळा होताना दिसत आहे ,त्यांच्या कष्टाची किंमत राहिलेली नाही म्हणूनच तर.. नको त्या मार्गाने पाऊल टाकून आपल्या जीवनात वादळ आणायला मागे, पुढे बघत नाही अशा लोकांकडून समाज काय शिकेल…?
आपल्या आई वडिलांच्या विषयी किंवा कुंटूबाच्या विषयी जराही विचार न करता व्यर्थ धंद्यांना खतपाणी घालण्यात मग्न असतात आणि आपल्या सोन्यासारख्या जीवनाची माती करतात असे कारनामे करणाऱे लोक देशाचे नाव उज्ज्वल करायचे सोडून बदनाम करण्याची संधी सोडत नाही. पुन्हा एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. यात लाच घेणारे काही लालची लोक फक्त,पुरूषच आहेत असे नाही त्यात काही स्त्रीया सुध्दा आहेत. अशा लालची स्त्रीयांना खरच काय म्हणावे..? त्यांच्या विषयी कोणता विचार करावा हेच समजत नाही. दररोज वृत्तपत्रात असे, अनेक बातम्या वाचून खूप दुःख होते. पण, एक स्त्री होण्याच्या नात्याने लाज सुध्दा वाटते.
या विषयावर ती थोडक्यात एक मत व्यक्त करावसं वाटतं की भारत देशाची पहिली शिक्षिका विद्येची देवता माता क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी प्रत्येक मुलीला, स्त्रीयांना शिक्षण घेता यावे म्हणून आयुष्यभर अफाट कष्ट सहन करून,समाजातील लोकांच्या शिव्या,निंदा,दगड, चिखल आपल्या अंगावर ती घेऊन सुद्धा सर्वं हसत,हसत सहन केले व शिक्षण दिले पण, आताच्या घडीला बघितले तर..स्त्री सुशिक्षित असून सुद्धा स्वतःच्या पायावरती उभी राहून स्वतंत्रपणे जगायचे सोडून व आकाशी झेप घ्यायची सोडून आजची स्त्री अशी वागते की, माईच्या कष्टाची किंमत ती, करण्यासाठी जराही वेळ काढत नाही, तीला पूर्णपणे विसरून चाललेली आहे. म्हणूनच तर..नको त्या मार्गाने जात आहे. त्या काळी जर.. माईंनी शिक्षण दिले नसते तर आजची स्त्री कुठे राहिली असती..? तीला नरकासारखे जीवन जगावे लागले असते. खुलेआम ती बाहेर फिरू शकली नसती पण,कोण सांगे कोणाला आपले कर्तव्य,तसेच प्रामाणिकपणे नौकरी, करायची सोडून “जेथे जाऊ तेथे खाऊ” असल्या प्रकारचे धंदे सुरू केली आहे. अशा लालची वागणुकीमुळे कुठेतरी माईचा अपमान होताना दिसत आहे. आपण कोणीही नाकारू शकत नाही. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणतात की,लालच बुरी बात है एवढे माहीत असताना सुद्धा आजचा माणूस,व स्त्री एवढ्या खालच्या थराला पोहचले आहेत की,अशा प्रकारचे व्यर्थ धंदे केल्याने पुढे काय होणार याचाही थोडाही विचार करीत नाही.
जेथे,तेथे स्वाभिमान विकायला मागे, पुढे बघत नाही. अशा लालची, लाचखोरांना चांगला धडा शिकविण्यासाठी शासनाने पक्का कायदा लागू करायला पाहिजे व अशी सजा द्यायला पाहिजे की, समाजामध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी असे लाच घेण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न करणार नाही. व मनामध्ये विचार आणणार नाही या विषयावर ती शासनाने खोलवर जाऊन विचार करायला पाहिजे व समाजामध्ये राहणारे असे, कितीतरी उच्च शिक्षण घेऊन खाली असणारे बेरोजगार तरुणांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. जेणेकरून त्यांच्या शिक्षण घेण्याला काहीतरी अर्थ लागेल..व ते, समाजासाठी, देशासाठी चांगले कार्य करून दिशादर्शक, व प्रेरणास्थान बनू शकतील.. तेव्हाच कुठेतरी पुन्हा एकदा माणसाची नव्याने वाटचाल होईल व सत्याचा विजय होईल.