अलिबागचा बालेकिल्ला अभेद्य राखण्याचे शेकाप समोर आव्हान

42

शिवसेना, भाजपचा वाढता प्रभाव 

 

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग :  गेली चार दशके अलिबाग नगरपालिकेवर शेकापने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. पण गेल्या काही वर्षात पक्षाची झालेली वाताहत आणि जिल्ह्यात शिवसेना, भाजपचा वाढता प्रभाव यामुळे पक्ष सध्या खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. अशा वेळी बालेकिल्ला अभेद्य राखणे हे शेतकरी कामगार पक्षा समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

   नगरपालिकेच्या २० प्रभाग आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. दोन प्रभागाचा अपवाद सोडला तर इतर सर्व प्रभागात दुरंगी लढत होणार आहे. निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत शेकाप काँग्रेस आघाडीला आव्हाने दिले आहे.

नगराध्यक्षपदसाठी शेकापकडून अक्षया नाईक यांना तर भाजपकडून माजी नगरसेवक तनुजा पेरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागक्रमांक दोन मधून भाजप उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना युतीला निवडणूकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर पालिका निवडणूकीत सत्ता मिळावी यासाठी भाजप शिवसेना युती आग्रही असली तरी ही वाटचाल सोपी असणार नाही. कारण आजवर झालेल्या निवडणूक निकालांचा अभ्यास केला तर लोकसभा विधानसभा निवडणूकीत शेकापला अपेक्षित मतदान होत नसले तरी नगरपालिका निवडणूकीत अलिबागकर ठामपणे शेकापच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र पहायला मिळत आले आहे. प्रशांत नाईक यांच्या कुटूंबाला असलेला जनाधार यास कारणीभूत ठरत आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाईक कुटूंबातील उमेदवार नगराध्यक्षपदासाठी शेकापने निवडणूक रिंगणात उतरवला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर शेकाप मध्ये झालेली फूट, विधानसभा निवडणूकीत झालेला पराभव, निवडणूकांमधील पक्षाचा सातत्याने खालावणारा आलेख याची सल कार्यकर्त्यांच्या मनात असणार आहे. याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप शिवसेना शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे.

घनकचरा व्यवस्थापन, वाढता पाणी प्रश्न, सांडपाणी व्यवस्थापन अभाव, त्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती, वाढते नागरीकरण त्यामुळे वाढणारा यंत्रणेवरचा ताण, आंग्रे समाधी स्थळ, नमिता नाईक क्रिडा संकुल, दुबईच्या धर्तीवर होणारे अद्यावर मत्सालय, मच्छी मार्केट या प्रकल्पांची रखडलेली कामे, अरुंद रस्ते, वाहतुक कोंडी, पार्कींग सुविधांचा अभाव यासारखे मुद्दे निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत