अलिबागमध्ये भोंदू बाबांचा विखारी प्रचार; नागरिकांमध्ये खळबळ

44

नगरपरिषद निवडणुकीत ‘अघोरी मार्केटिंग’?

 

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग: अलिबाग शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक चर्चा शहरभर पसरली आहे. सात ते आठ गाड्यांमध्ये आलेले अघोरी भोंदू बाबा अलिबागमध्ये फिरत असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला असून, या संपूर्ण प्रकरणावर राजकीय रंग चढू लागला आहे.

या गाड्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे दिसून आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे भोंदू बाबा आणि त्यांची टीम कोळीवाडा, मोहल्ला, कस्टम बंदर परिसरांत फिरताना आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली. या बाबत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्याकडे जाऊन विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पोलिसांना बोलावण्याची चेतावणी मिळताच तातडीने तेथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.

सदर बाबा नेमके कोण? त्यांना अलिबागमध्ये कोणी बोलावले? निवडणुकीच्या तोंडावर अशा संशयास्पद हालचाली का? या प्रश्नांवर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अस्तित्वात अशा प्रकारचे अघोरी कृत्य करणाऱ्यांना निवडणूक काळात शहरात मुक्तपणे फिरू देणे ही बाब नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारी ठरली आहे. गरजूंना फसवणारे, निवडणुकीत ‘भाग्य फिरवण्याचे’ आश्वासन देणारे आणि मतदारांचे मनोबल ढवळून काढण्यासाठी जादूटोणाचा आधार घेणारे अशा भोंदूंचा पर्दाफाश करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत असून, पोलिसांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निवडणूक काळात प्रलोभने, खोट्या अफवा, आर्थिक व्यवहार यांची चर्चा तर कायम असतेच; पण आता अघोरी विद्या आणि जादूटोण्यातून मतदारांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नांनी अलिबागची हवा अधिकच तापली आहे. पोलिसांनी या गाड्यांची व व्यक्तींची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.