जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देश — मुंबई–वडोदरा एक्सप्रेस वे कामांना गती, आश्रमशाळांमधील सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर

39

अपूर्ण कामे व आव्हाने जाणून घेत तातडीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

भरत पुंजारा 

पालघर तालुका प्रतिनिधी 

मो.९९२३८२४४०७

 

पालघर, दि. 27 नोव्हेंबर: जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आज मुंबई–वडोदरा एक्सप्रेस वेच्या कामांची सखोल पाहणी करून कामाला अधिक वेग देण्याच्या, सुरक्षाव्यवस्था मजबूत ठेवण्याच्या आणि वाहतूक मार्गांवरील पर्यायी नियोजन प्रभावीपणे राबवण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कामाची प्रगती, अंमलबजावणी आणि जनसुरक्षा यांचा समन्वय साधत प्रकल्प लवकर पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

कामाच्या पाहणीदरम्यान डॉ. जाखड यांनी अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा अहवाल घेतला तसेच अपूर्ण कामे व आव्हाने जाणून घेत तातडीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला मिळणारा गतीमान वेग लक्षात घेता हे कार्य अत्यंत प्राथमिकतेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी मुलींची शासकीय आश्रमशाळा, वरवाडा येथे अचानक भेट देत विद्यार्थिनींशी संवाद साधला. शैक्षणिक सुविधा, वसतिगृहातील निवास व्यवस्था, आहार, स्वच्छता, सुरक्षितता इत्यादी सर्व बाबींची स्वतंत्र पाहणी करत विद्यार्थिनींच्या अडचणी व गरजांबाबत थेट विचारपूस केली. संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देत “शैक्षणिक संस्थांतील सुविधा उंचावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे” असे त्यांनी नमूद केले.

या दौऱ्यात पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण (NHAI), ठाणे येथील व्यवस्थापक उपस्थित होते.

जिल्ह्यातील महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे व आदिवासी भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्पष्ट केले.