दुर्गम गावातील उपक्रमशील युवक प्रफुल्ल गुलाबराव शेंडे याने धिंगरी, मिल्की आणि पॅडी स्र्टॉ अळिंबी उत्पादनासाठी पुढाकार

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर, जि. चंद्रपूर) या दुर्गम गावातील उपक्रमशील युवक प्रफुल्ल गुलाबराव शेंडे याने शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत धिंगरी, मिल्की आणि पॅडी स्र्टॉ अळिंबी उत्पादनासाठी पुढाकार घेतला.टप्प्याटप्प्याने ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांना मागणीनुसार पुरवठा करत अळिंबी उत्पादनाचा ‘जीबीएस’ ब्रॅण्ड राज्य, परराज्यांत पोहोचविला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील खुटाळा (ता. चिमूर) गावाची लोकसंख्या जेमतेम १२००. या गावातील प्रफुल्ल शेंडे यांच्या कुटुंबीयांची आठ एकर शेती असून त्यामध्ये भात आणि हंगामी भाजीपाला लागवड असते. प्रफुल्ल शेंडे यांचा मोठा भाऊ अतुल हा शेती पाहतो. प्रफुल्ल हा एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) पर्यंत शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याच दरम्यान त्याने यू ट्यूबवर अळिंबी उत्पादन आणि विक्रीची स्टोरी पाहिली आणि यातून त्याला स्वयंरोजगाराची संधी दिसली.
मूल (जि. चंद्रपूर) येथील विनोद कावळे यांचा अळिंबी उत्पादन उद्योग आहे. त्यांच्याकडून प्रफुल्ल शेंडे याने या व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. ५ नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रफुल्ल याने धिंगरी अळिंबी उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. एक किलो धिंगरी अळिंबी बियाणे घेऊन त्याने १७ बॅगा भरल्या. यातून अळिंबी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने प्रफुल्ल याने व्यावसायिक पद्धतीने उत्पादनाचा निर्णय घेतला. अळिंबीच्या विविध प्रजाती आहेत. त्यामध्ये बटण, धिंगरी आणि मिल्की अळिंबीला खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे. सध्या बटण अळिंबी मोठ्या प्रमाणात विकली जाते. त्यानंतर धिंगरी आणि मिल्कीचा वाटा आहे. सध्या प्रफुल्ल धिंगरी, मिल्की आणि पॅडी स्र्टॉ अळिंबीची निर्मिती करून विक्री करत आहे.तीन ते चार दिवस अळिंबीला फ्रीजमध्ये ठेवता येते. परंतु विक्रेता म्हणून तसे करता येत नाही. एकदा ग्राहक न मिळाल्याने दोन दिवस अळिंबीचा मोठा साठा फ्रीजमध्ये साठून राहिला. परिणामी काही सुचत नसल्याने ही अळिंबी प्रफुल्लने नमुन्यादाखल मोफत देण्याचा निर्णय घेतला. अळिंबीचे ३६ पॅक करून ते चंद्रपुरातील चायनीज पदार्थ विक्रेत्यांना मोफत दिले. त्यातील एका चायनीज विक्रेत्याचा फोन आला. अळिंबीचा दर्जा चांगला असल्याने त्याने नियमित पुरवठा करण्यास सांगितले. आता चंद्रपुरातील चायनीज पदार्थ विक्रेते प्रफुल्लकडूनच अळिंबी खरेदी करतात. ताज्या अळिंबीला चांगली मागणी असल्याचे त्याच्या विक्रीचे नियोजन प्रफुल्लने केले आहे.
राज्य, परराज्यांतून प्रक्रिया उत्पादनांना मागणी
प्रफुल्ल चंद्रपूर शहरातील चायनीज पदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या मागणीनुसार महिन्याला दीड क्विंटल अळिंबीची विक्री करतो. सध्या ३०० रुपये किलो दराने विक्री होते. किराणा दुकान तसेच भाजी बाजारात किरकोळ विक्री ४०० रुपये किलो या दराने होते. १०० ग्रॅम पॅकिंगमध्ये अळिंबीची विक्री होते. ४० रुपयांना हे पॅकिंग विकले जाते.
गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशातील नोएडा, ओडिशामधील झारसुगडा जिल्ह्यातील विक्रेत्यांना प्रफुल्ल अळिंबी प्रक्रिया पदार्थांचा पुरवठा करतो. अळिंबीचे आहारातील महत्त्व वाढीस लागावे याकरिता प्रफुल्लने यू-ट्यूब चॅनल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून देखील त्याला ग्राहक मिळतात.
अळिंबीचा ‘जीबीएस’ ब्रॅण्ड
प्रफुल्ल शेंडे हा २०११ ते २०१३ या कालावधीत चंद्रपूर शहरात राहत होता. त्या वेळी शहरात त्याचे अनेक मित्र तयार झाले होते. त्यासोबतच ‘कमवा आणि शिका’ या पॅटर्ननुसार दिवसा कॉलेज करून रात्रीच्या वेळी रुग्णालयात व्यवस्थापक पदावर तो नोकरी करत होता. या सर्व माध्यमातून झालेल्या ओळखीचा फायदा अळिंबी विक्रीसाठी करण्याचा त्याने निर्णय घेतला.
अळिंबी विक्रीसाठी त्याने ‘प्रफुल्ल’ ब्रॅण्ड तयार केला. परंतु प्रफुल्ल नावाने आधीच एका कंपनीची नोंदणी असल्याने हे नाव त्याच्या उत्पादनाला मिळाले नाही. या प्रक्रियेत सुरुवातीचा एक महिना गेला. त्यानंतर नव्या नावाचा शोध सुरू झाला. गुलाबराव बळिराम शेंडे असे प्रफुल्लच्या वडिलांचे नाव. त्यांच्याच नावाने प्रफुल्लने २०१९ मध्ये ‘जीबीएस’ ब्रॅण्ड तयार करून अळिंबी विक्रीचा निर्णय घेतला. पुढील टप्प्यात प्रफुल्लने जीबीएस मशरूम अॅण्ड अॅग्रो बिझनेसेस प्रा. लि. या कंपनीची नोंदणी केली. कंपनी नोंदणीसाठी सुमारे १७ हजार रुपयांचा खर्च झाला. कंपनीत संचालक म्हणून प्रफुल्लचा लहान भाऊ राहुल शेंडे याचा समावेश आहे. एक लाख रुपयांचे भांडवल कंपनीच्या खात्यात शेअर्स म्हणून जमा करण्यात आले.
अळिंबीपासून पावडर, लोणचे, पापड
प्रफुल्ल परराज्यांतील व्यापाऱ्यांना वाळविलेली अळिंबी पॅकिंग करून पुरवठा करतो. वाळविलेल्या अळिंबीची पावडर (२५०० रुपये किलो), ओल्या अळिंबीचे लोणचे (६०० रुपये किलो), कुकीज (४०० ते ५०० रुपये किलो), पापड (६०० रुपये किलो) निर्मितीवर प्रफुल्लने भर दिला आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार कुकीज १५० ग्रॅम आणि लोणचे, पापड याचे पॅकिंग १०० ग्रॅममध्ये उपलब्ध करून दिले आहे. चिली, नूडल्स, पकोडे निर्मिती, तसेच इतर अनेक पदार्थांमध्ये अळिंबीचा वापर होत असल्याने बाजारपेठेत मागणी वाढत असल्याचे प्रफुल्ल आत्मविश्वासाने सांगतो.