धोकादायक ऊस वाहतूकीमुळे कसे होतात रस्ते अपघात

उसाच्या ट्रॅक्टरला धडकून अपघात झाला अशी बातमी हल्ली कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतेच. यावर्षी अशा अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अद्याप वाचायला मिळाली नसली तरी या आधी अशा अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी दौंडमध्ये झालेल्या अपघातात तीन तरुण मुलांना अशा अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. काष्टी तालुका श्रीगोंदा येथील पंचविशीतील तीन तरुणांची दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरला धडकली कारण उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर बसविण्यात आले नव्हते. रिफ्लेक्टर नसल्याने या तरुणांना उसाचा ट्रॅक्टर दिसला नाही त्यामुळे अपघात झाला आणि त्यात निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. सातत्याने असे अपघात होऊनही ऊस वाहतूकदारांना शिस्त लागत नाही. सध्या राज्यात ऊस वाहतूक जोरात सुरू आहे. अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन कारखाने आहेत. त्यामुळे ऊस तोड करून उसाची वाहतूक जोमात सुरू आहे मात्र त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धोका वाढला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या पाठीमागे किंवा बाजूला कोणत्याही उपाययोजना नसल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. ऊस वाहतूक करताना क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक केली जात आहे. ट्रॅक्टर चालक दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ऊस वाहतूक करतात त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना फक्त ट्रॅक्टर दिसतो परंतु त्या ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या ट्रॉलीवर कोणतेच इंडिकेटर नसल्याने फसगत होते. बऱ्याचदा वाहनांच्या एकदम जवळ गेल्यावर त्या ट्रॉली दिसतात मग घाई गडबडीत वाहन चालकांची अपघात रोखणयासाठी धांदल उडते. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लंप नसल्याने रात्री अनेक वाहन चालकांना पुढे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे याचा अंदाज येत नाही त्यामुळेही अपघात होतात. 

ऊस वाहतूक करणारे वाहन चालक वाहन रस्त्याच्या मध्येच थांबवतात त्यामुळे अपघातांना आयतेच निमंत्रण मिळते. अनेक वाहन चालकांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. काही वाहनांवर तर चक्क अल्पवयीन चालक असतात. ऊस वाहतूक करणारे सर्वच चालक मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावतात त्यामुळे लक्ष तर विचलित होतेच पण ट्रॅक्टरच्या पाठीमागे काय घडले याचा वाहन चालकाला अंदाज देखील येत नाही. मोठ्या आवाजतील गाण्यांमुळे इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज वाहन चालकांना येत नाही. उसाची वाहतूक रात्रभर चालू असते आणि स्पीकर मोठमोठ्याने चालूच असल्याने रस्त्याच्या कडेवरील गावातील लोकांची झोपमोड होते. अंधारात बैल गाडीने देखील ऊस कारखान्यात नेला जातो. उसाने भरलेली बैलगाडी अंधारात जात असताना समोरून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दिसत नाही त्यामुळे देखील अपघात होतात. यापुढे तरी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नये यासाठी आरटीओ प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी नियमावली तयार करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत म्हणजे धोकेदायकपणे सुरू असलेल्या या ऊस वाहतुकीला शिस्त लागेल आणि लोकांच्या जिविताशी चालणारा खेळ थांबेल.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here