माध्यमिक शाळा सकाळी तर प्राथमिक शाळांच्या वेळात बदल होणार असल्याची शक्यता…
शिक्षण विभाामार्फत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. रमेश बैस यांनी लहान मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने शाळांची सकाळची वेळ बदलण्याची सूचना केली. मा. राज्यपालांच्या या सूचनेनंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले. केवळ शिक्षण क्षेत्रातूनच नाही तर समाजातील सर्व घतकांतून राज्यपालांच्या या सूचनेला पाठिंबा मिळू लागला विशेषतः पालक वर्गाने मुलांची सकाळची शाळेची बदलण्याची मागणी केली. बहुसंख्य पालकांचा या मागणीला पाठिंबा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तसेच बाल मानस शास्त्रज्ञांनी देखील लहान मुलांची शाळा सकाळची असल्याने त्यांची पुरेशी झोप होत नाही त्याच्या परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे म्हंटले आहे. आपल्या राज्यात शहरातील सर्व शाळा दोन सत्रात भरतात. एकाच इमारतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा भरत असल्याने सकाळच्या सत्रात प्राथमिक तर दुपारच्या सत्रात माध्यमिक शाळा भरते. सकाळच्या प्राथमिक शाळेची वेळ सकाळी सात ते बारा तर माध्यमिक शाळेची वेळ दुपारी १२. १५ ते संध्याकाळी ५.४५ अशी असते.
प्राथमिक शाळेच्या मुलांचा वयोगट पाच ते दहा असा आहे शिवाय बालवाडी आणि अंगणवाडीतील मुलांचा वयोगट तीन ते पाच असा आहे त्यांची देखील शाळा सकाळीच भरते. माध्यमिक शाळेतील मुलांचा वयोगट अकरा ते सोळा असा आहे. लहान वयोगटातील मुलांची शाळा सकाळी सात वाजता असल्याने त्यांना सकाळी सहा वाजताच उठावे लागते. झोपेतून उठताना ही मुले रडतच उठवतात कारण त्यांची पुरेशी झोप झालेली नसते. या मुलांना झोपेतून उठवणे पालकांसाठी मोठे दिव्य असते. पुरेशी झोप न झाल्याने बरेचसे मुले आळसावलेल्या चेहऱ्यानेच शाळेत येतात. पुरेशी झोप न झाल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवरही होतो. मुलांना किमान सहा ते आठ तास पूर्ण झोप मिळाली पाहिजे असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आताच्या मुलांची तशी झोप होत नाही कारण सध्याची बदललेली जीवनशैली. सध्याची जी शाळेची वेळ आहे ती पूर्वी देखील होती मात्र तेंव्हा हा प्रश्न उपस्थित होत नव्हता कारण तेंव्हा मुलांसह पालकही दहाच्या आत झोपायचे पण सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत पालकच बारा वाजेपर्यंत जागे असतात त्यामुळे मुले देखील बारा वाजेपर्यंत झोपत नाही अर्थात त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही. पालकांनी लवकर झोपण्याचा प्रयत्न केला तरी उशीर होतोच त्यामुळे मुले देखील उशिरा झोपतात त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही. प्राथमिक शाळेतील मुलांची पुरेशी झोप होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच त्यांच्या अध्ययन प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी त्यांच्या शाळेची वेळ बदलणेच योग्य आहे.
ग्रामीण भागातील शाळा सकाळी दहा ते पाच वेळात असतात तिथे हा प्रश्न उपस्थित होत नाही शहरात मात्र या वेळेत शाळा भरवता येणार नाही कारण शहरात एकाच इमारतीत प्राथमिक आणि माध्यमिकचे वर्ग भरतात मग यातून मार्ग काढण्याचा एक पर्याय म्हणजे मध्यमिकच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवणे व प्राथमिक शाळा दुपारच्या सत्रात भरवणे. प्राथमिक शाळेची वेळ बदलून ती दुपारच्या सत्रात केली तर प्राथमिक शाळेतील मुलांची झोपही पुरेशी होईल त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहील. माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वयाने मोठे असल्याने ते सकाळी लवकर उठू शकतात शिवाय त्यांना लवकर झोपण्यास सांगितल्यास तर लवकर झोपू शकतात परिणामी दोन्ही वयोगटातील मुलांची पुरेशी झोप होऊ शकते.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५