‘वेगळ्या वाटे’ला सलाम!

48

एका ध्येयाने-एका ध्यासाने पछाडलेली माणसे भवताली बरीच असतात. यातील काही प्रत्यक्षपणे माणसांच्या विकासासाठी झटत असतात. काहींची अप्रत्यक्ष सकारात्मक कृती माणसांना समृद्ध करते. यातील बऱ्याच व्यक्तींची निर्व्याज सेवा सुरू असतो. समाजाने दखल घेतली काय आणि न घेतली काय, या व्यक्तींचा ध्येय-ध्यास आपला मार्ग चुकू देत नाही. अशा व्यक्तींची समाजाकडून, सरकारकडून जाणीवपूर्वक आणि काळजीने दखल घेणे अपेक्षित असते. केंद्र सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांबाबत ती अपेक्षित आहे. यंदा जाहीर झालेल्या पुरस्कारांतील नावे बघता ती जाणीवपूर्वक काळजी घेतल्याचे दिसून येते. यंदा हा सन्मान मिळालेली बव्हंशी नावे ही जाणीवपूर्वक वेगळी वाट चोखाळणाऱ्यांची आहेत. अर्थात काही व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यात दिरंगाई झाली आहे. यंदाच्या ‘पद्मविभूषण’साठी ज्येष्ठ संगीतकार इलय्याराजा, ज्येष्ठ शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ यांच्यासह कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष; शिक्षणतज्ज्ञ पी. परमेश्वरन यांची निवड झाली आहे. ‘पद्मभूषण’साठी नऊ जाणांची निवड झाली. यात गोव्यातील व्यासंगी चित्रकार, ललित कला अकादमीचे तीन पुरस्कार मिळविणाऱ्या लक्ष्मण पै यांच्याह ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख, इतिहासतज्ज्ञ आर. नागस्वामी यांच्यासह बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. ‘पद्मश्री’ने यंदा ७३ जणांचा गौरव केला जाणार आहे. पैकी तेरा विदेशी आहेत. ‘पद्मश्री’साठी ‘महाराष्ट्रभूषण’ डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दाम्पत्याची तसेच ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांची ‘पद्मश्री’साठी उशिरानेच दखल घेण्यात आली खरी, ‘देर से आये, दुरुस्त आये’ या न्यायाने दखल घेतली, याचा अवघ्या महाराष्ट्राला आनंद आहे. पुण्यातील अरविंद गुप्ता, पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकाविणारे मुरलीकांत पेटकर यांचीही निवड महाराष्ट्रासाठी कौतुकाची आहे. खेळता खेळता विज्ञान शिकविणारे गुप्ता नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत आहेत. सिकलसेलग्रस्तांसाठी आयुष्य खर्ची घालणारे नागपूरचे संपत रामटेके यांना मरणोत्तर हा सन्मान मिळणार आहे. हयात असताना रामटेके यांना हा सन्मान मिळाला असता तर त्यांच्या कार्याला निश्चितच गती मिळाली असती. भगवद्गीतेतील सातशे श्लोकांचे उर्दूत भाषांतर करणारे लखनौचे शायर अन्वर जलालपुरी यांनाही हा सन्मान मरणोत्तर मिळत आहे. वनौषधींद्वारे सर्पदंश व इतर विषारी कीटकांच्या दंशावर उपचार करणाऱ्या लक्ष्मीकुट्टी, गोंड शैलीत युरोप चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले गोंड कलाकार भज्जू श्याम, गरिबांच्या आसऱ्यासाठी झटणारे सुधांशू विश्वास, गरिबांसाठी रुग्णालय उभारणाऱ्या सुभाषिणी मिस्त्री, नवजात अर्भकांना जीवदान देणारे एम. आर. राजगोपाल, अंदमान निकोबार बेटांवरील वन्यजीव संरक्षक रोमुलस व्हाइटेकर, देवदासी महिलांसाठी झटणाऱ्या सीतव्वा जोद्दती, प्लास्टिकचा वापर करून रस्ते बांधणीचे तंत्र विकसित करणाऱ्या राजगोपालन वासुदेवन आदींचा समावेश आहे. या यादीत बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याचेही नाव आहे. एकूण यादीत सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा वरचष्मा आहे. विज्ञान, क्रीडा, महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचीही प्रभावी दखल हवी. यंदाही ‘भारतरत्न’ची घोषणा नाही. देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’साठी मात्र निवड समितीला एकही नाव मिळाले नाही. या तज्ज्ञांच्या समितीचा शोध थांबला की आणखी काही, काय समजावे? सचिन तेंडुलकर याला ‘भारतरत्न’ देताना तत्कालीन सरकारने दाखविलेली तत्परता विधायक कार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींच्याही वाट्याला यायला हवी. मुळात या पुरस्कारांसाठी वय वा ज्येष्ठता हा निकष नसावा. तो लावायचा झालाच तर ‘स्वच्छ भारत मोहिमे’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावेत असे शेगाव संस्थानचे शिवशंकर पाटील यांना हा सन्मान हुलकावणी का देतो, हा प्रश्न पडतो. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठांची दखल घेताना एका विषयावर नेटाने आणि नेमाने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. तद्वतच सन्मानप्राप्त व्यक्तींच्या कार्याला बळ देण्याची सजगताही सरकारकडून दाखविणे गरजेचे आहे. तंबाखूचे व्यसन लागू नये म्हणून दुकानातून चॉकलेट-गोळ्या बाद करण्याचा निर्णय होतो. मग बंग दाम्पत्याकडून सातत्याने होत असलेल्या ‘दारूमुक्ती’च्या आवाहनाचाही सरकारकडून गांभीर्याने विचार व्हायला हवा. हे पुरस्कार नुसती औपचारिकता ठरू नये!

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न

सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.