पालघर : बोईसर रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्या वेळी लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने दोन गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. या वादाला वैतागलेल्या काही संतप्त प्रवाशांनी ‘रेल रोको’ केल्यामुळे एक्सप्रेस गाड्या आणि लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आणि पश्चिम रेल्वेच्या हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

आज सकाळी बोईसर स्थानकात हा प्रकार घडला. लोकल येताच नेहमीप्रमाणे लोक आत शिरले. यावेळी पासधारक आणि अन्य प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. एक पुरुष आणि महिला प्रवाशात बसण्याच्या जागेवरून आधी शाब्दिक चकमक उडाली. अन्य काही प्रवासीही या भांडणात सहभागी झाले. बघता बघता प्रकरण हातघाईवर आलं आणि दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली. संपूर्ण डब्यात हा प्रकार सुरू होता. त्यानंतर काही संतप्त प्रवाशांनी खाली उतरून वांद्रे-भुज पॅसेंजर ट्रेन रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बोईसर रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचे वातावरण होते.

अखेर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना पांगविले. त्यामुळे वांद्रे-भुज एक्सप्रेस सुरू झाली. मात्र, प्रवाशांनी केलेल्या या आंदोलनामुळे एक्सप्रेस गाड्या आणि लोकल तासभर रखडली. त्यामुळे इतर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तासाभरानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून भांडण करणाऱ्या एक पुरुष आणि एका महिला प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here