मुंबई: राज्यसरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर धर्मा पाटील या शेतकऱ्याचा कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले आहे. पाटील कुटुंबीयांनी धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून ते धुळ्याकडे रवाना झाले आहेत.

जो पर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही आणि जोपर्यंत धर्मा पाटील यांना ‘शहीद भूमिपुत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचे सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिला होता. या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून पाटील कुटुंबीयांनी जे. जे. रुग्णालयाच्या आवाराबाहेर आंदोलनही सुरू केलं होतं. माध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरले होते. त्यामुळे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. तसेच जमिनीच्या फेरमूल्यांकनाची घोषणाही त्यांनी केली होती. तसं लेखी आश्वासन बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना पाठविल्यानंतर पाटील यांनी जे.जे. रुग्णालयाबाहेर सुरू केलेलं आंदोलन मागे घेतलं. पाटील यांनी वडील धर्मा पाटील यांचा मृतदेहही ताब्यात घेतला असून त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी धुळ्याला निघाले आहेत. दरम्यान, धर्मा पाटील यांना ‘शहीद भूमिपूत्र शेतकरी’ असा दर्जा देण्याचं कोणतंही लेखी आश्वासन सरकारने दिलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here