नांदेड मारहाणप्रकरणी तिघांना दोन वर्षाची शिक्षा
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760
नांदेड : – शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवाशी असलेल्या एका कुटुंबातील मंडळी घरात बसले असता शेजारील कुटुंबातील तिघांनी संगनमत करून घरात घुसून जबर मारहाण केली. त्या मारहाणीत दोघे जखमी झाले होते. सदरील घटना गत सहा वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणामध्ये तिघा आरोपींना दोन वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेसह पाच हजारांचा दंड लोहा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायालयाने ठोठावला.
लोहा शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथे राहणारे भीमराव पुंडलिक गायकवाड हे दि.२५ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी घरात पत्नी रंजना गायकवाड व मुलगी प्रिया गायकवाड सोबत बसले असता आरोपी गेंदाजी किशनराव देवकांबळे, सुंदरबाई गेंदाजी देवकांबळे दोघे रा.लोहा व इंदरबाई पोचीराम गायकवाड रा. पेठवडाज ता.कंधार या तिघांनी संगनमत करून भीमराव गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीस जबर मारहाण केली होती.
सदर प्रकरणाचा खटला लोह्याच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुरू होता. सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने लोहा न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी.तौर यांनी दि.२८ रोजी सदर खटल्याचा निकाल सुनावला. त्यामध्ये उपरोक्त तीन आरोपींना दोन वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह पाच हजाराचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने अधिकची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड.राजेश जोशी यांनी बाजू मांडली.तपास के. आर.राठोड यांनी केला व यु.एन. घुगे यांनी पैरवी केली.