कामगारांच्या मोर्चाने नांदेड शहर दणाणले
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760
नांदेड देशातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने कलामंदिरपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता.२८) मोर्चा नेण्यात आला. या मोर्चातील घोषणांनी नांदेड दुमदुमले. तर वीज मंडळ, बँक कर्मचारी, पोस्ट, एलआयसीमध्ये या संपाचा परिणाम दिसून आला. शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले तर वीज कर्मचारी व बँक कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
कामगार कर्मचारी विरोधी धोरणे रद्द करावीत, वाढत्या महागाईला आळा घालावा, यासह इतर मागण्यांसाठी देश पातळीवरील आयटक, सिटू, लाल निशाण आदी प्रमुख अकरा संघटनांनी ता. २८ आणि ता. २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. आजच्या संपाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील कामगारांनी सहभाग नोंदविला. कामगार विरोधी जुने कामगार कायदे पुर्ववत लागू करावेत, चार लेबर कोड रद्द करावेत, खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, एन.एम.पी. च्या नावाखाली सुरु असलेला राष्ट्रीय संपत्तीची विक्री थांबवावी, महागाईला आळा घालावा, पेट्रोलजन्य, घरगुती वापराचा गॅस करमुक्त करावे, बँकांचे खासगीकरण रद्द करावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, सर्व क्षेत्रातील कामगारांना सरसकट प्रतिमहा २८ हजार रुपये वेतन निश्चित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य, सफाई, आशा, अर्धवेळ परिचारिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींना प्रोत्साहन भत्ता अदा करावा, आदी मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरु केला आहे.