बंधने फक्त महिलांवरच का ?
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
आज २१ व्या शतकात पुरुष आणि महिला असा कोणताच भेद राहिला नाही. आज महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिला पुरुषांची बरोबरी करू शकत नाही. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे मात्र समाजात आजही असा एक घटक आहे ज्यांना महिलांची ही प्रगती खटकत आहे. आजही तो घटक महिलांना केवळ चूल आणि मूल या पुरतच मर्यादित ठेवू इच्छितो म्हणूनच हे सनातनी विचारांचे प्रतिगामी लोक महिलांना सतत या ना त्या कारणांहून ट्रोल करत असतात. कधी ते महिलांच्या केशभूषे वरून ट्रोल करतात तर कधी ते महिलांना त्यांच्या वेशभूषेवरुन ट्रोल करतात.
आजच्या मुली मुलांप्रमाणे कपडे घालतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात त्यांच्या जीन्स पॅन्ट गुडघ्यावर फाटलेल्या असतात याचा त्यांना राग येतो तर कधी मुलींच्या नटण्या मुरडण्याचा त्यांना राग येतो. महिलांना ट्रोल करण्यात समाजातील प्रतिष्ठित घटकही मागे नसतात. महिला गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालतात हे कसले संस्कार असे ? असा प्रश्न मध्यंतरी उत्तरांचलच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत विचारला होता. केवळ हेच महाशय नाही तर अनेकजण महिलांच्या वेशभूषेवरुन महिलांना टार्गेट करत असतात वास्तविक कोणी कोणते कपडे वापरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी गुडघ्यावर फाटलेली जीन्स पॅन्ट फक्त महिलाच घालतात का? पुरुषही फाटलेली जीन्स घालतात. बरमुडा किंवा शॉर्ट पॅन्ट घालून गावभर फिरतात पण त्यांच्या कपड्यावर कोणीच आक्षेप घेत नाही. म्हणजे पुरुषांनी कसलेली कपडे वापरले तरी चालेल मात्र महिलांना ते स्वातंत्र्य नाही. महिलांना मात्र त्यांच्या आवडीचे कपडे घालायला बंदी. मग प्रश्न येतो बंधने फक्त महिलांवरच का? महिलांनी कोणते कपडे घालावेत हे ठरवण्याचा अधिकार पुरुषांना कोणी दिला? महिलांनी कोणते व कसे कपडे घालावेत, महिलांनी कोठे फिरावे, काय खावे, काय प्यावे हे पुरुषांनी ठरवावे ही तर अठराव्या शतकातील मानसिकता झाली.
२१ व्या शतकातही महिलांना समान अधिकार मिळत नाही त्यांना त्यांच्या अधिकारासाठी झगडावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. स्त्री पुरुष समानता ही फक्त बोलण्यापूरतीच आहे हेच या मानसिकतेतून दिसून येते. जगात एकीकडे महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी चळवळ उभी केली जात आहे तर आपल्याकडे महिलांनी कसे राहायचे, तिने कोणते कपडे घालायचे, कसे कपडे घालायचे यावर चर्चा केली जाते. प्रश्न महिलांनी कसे आणि कोणते कपडे घालायचा हा नसून प्रश्न त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा आणि महिलांच्या मानवी हक्काचा आहे. हे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये. महिला गुडघ्यावर फटलेली जीन्स घालतात, तोकडे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात असा तर्क लढवला जातो.
महिला संध्याकाळी बाहेर फिरायला जातात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात असाही दावा तथाकथित संस्कृती रक्षक करतात पण ते सोयीस्करपणे हे विसरतात की आपल्या देशात अंगभर कपडे घातलेल्या साठ सत्तर वर्षाच्या वृद्धेवर देखील बलात्कार होतो. विकृत मानसिकता असलेले लोक अंगभर कपडे घातलेल्या महिलांकडे देखील विकृत नजरेने पाहतात. अंगभर कपडे असोत की तोकडे कपडे असोत ज्यांची मानसिकता विकृत आहे त्या नराधमांना महिला केवळ भोगवस्तू वाटते. महिलांच्या कपड्यांवर भाष्य करण्याऐवजी ही पुरुषी मानसिकता बदलली तर देशात महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाही.