रायगड जि.प.ची सर्व कार्यालये एकाच परिसरात आल्याने जनतेला सोयीचे – आदिती तटकरे
जिल्हा परिषद प्रशासनाचे केले कौतुक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला भेट दिली. जिल्हा परिषदेची जुनी प्रशासकीय इमारत जीर्ण झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या कार्यालयांचे अलिबाग शहरातील कुंटे बाग येथे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित कार्यालयांची पाहणी त्यांनी केली. यावेळी उत्तम नियोजन करीत सर्व विभागांची कार्यालये एकाच परिसरात स्थलांतरित केल्याने आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक करीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे अभिनंदन केले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गुरुवारी अलिबागमध्ये नियोजित बैठकीसाठी आल्या होत्या. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी कुंटे बाग येथे जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग कार्यालयांमध्ये जाऊन पाहणी केली. प्रशासकीय इमारत जीर्ण झाल्यानंतर कुंटे बाग येथे एकच परिसरात उत्तमरित्या सर्व विभागांच्या कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एकाच विभागात सर्व कार्यालये असल्याने ग्रामीण भागातील जनतेला ते सोयीचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता राहुल देवांग, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.