न्यू इंग्लिश स्कूल बोर्ली पंचतन च्या १९८१-१९८२ या वर्षातील विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन

न्यू इंग्लिश स्कूल बोर्ली पंचतन च्या १९८१-१९८२ या वर्षातील विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन

✍️सचिन सतीश मापुस्कर ✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
8698536457

दिघी – बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या (श्री.मोहनलाल सोनी विद्यालय) १९८१-८२ या वर्षीतील इ. १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन नुकतेच शुक्रवार व शनिवार दि. १८/१९ एप्रिल २०२५ रोजी तोणदे,ता./जि.रत्नागिरी येथील हापुस अग्रो टुरिझम याठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४३ वर्षांनी हे बालमित्र वयाच्या साठीच्या जवळपास एकत्र आले. वर्गात एकूण ५४ विद्यार्थी होते. पैकी ४४ मुले आणि १० मुली होत्या. सद्यस्थितीत ६ जण दिवंगत असून उर्वरित ४८ पैकी २४ जण सहभागी झाले. साधारण दोन वर्षांपूर्वी प्रसाद सिताराम मोरे यांनी गेट टुगेदर ची संकल्पना संदीप पाटील आणि लीलाधर खोत यांच्या समोर विषद केली. सर्व प्रथम व्हाट्सऍप गृप तयार करून विविध माध्यमातून वर्गमित्र व वर्ग मैत्रिणीं ना एकत्र करण्याचे काम केले. आजमितीस ४२ सदस्य सक्रिय आहेत. साधारणपणे दोन महिन्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तोणदे या ठिकाणी असलेले श्री. दिपक नागवेकर यांचे हापुस अग्रो टुरिझम या ठिकाणाची माहिती मिळाली आणि ती आमच्या गृप वर शेअर केली. त्याला २४ सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे प्रसाद मोरे आणि रवींद्र मोरे यांनी ३० सीटर बस ठरविली. आणि शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८ वा. होळीच्या पटांगणात बोर्ली परिसरातील १८ जण एकत्र जमले. जुन्या शाळेत ज्याठिकाणी सर्वांनी ५वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले त्या शाळेचे दर्शन घेतले. तसेच ज्या शिक्षकांनी १० वी ला अध्यापन केले व घडवले त्यांच्या आठवणी काढल्या तदनंतर ग्रामदेवता आई चिंचबामातेचं दर्शन घेऊन गार्हाणं घालून प्रवासाला सुरुवात केली. लोणेरे पर्यंत च्या दीड तासाच्या प्रवासात हास्यविनोद, शालेय जीवनातील रम्य आठवणी व जगदीश घोसाळकर च्या सुरेल आवाजातील गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला. लोणेरे या ठिकाणी मुंबई, पनवेल तसेच नागोठणे येथून ६ जण सामिल झाले. त्यांना आणण्याची जबाबदारी दिलीप चांदोरकर या वर्ग मित्राने पार पाडली. येथील शिंदे ढाबा मध्ये नाश्ता घेउन २४ जणांचा पुढील एकत्र प्रवास सुरू झाला. पुन्हा तीच धमाल, तीच मस्ती व मौज सुरू झाली. चिपळूण च्या पुढे गेल्यावर झाडांच्या सावलीत थांबून रुचकर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. ते जेवण बनविण्यासाठी रवींद्र मोरे व प्रसाद मोरे यांनी खूप मेहनत घेतली आणि ती यशस्वी झाली. अशाप्रकारे सं. ६ वा. नियोजित ठिकाणी (हापुस अग्रो टुरिझम) सुखरुप पोहोचलो. दिपक नागवेकर यांच्या टीमने आमचे स्वागत करुन रहायची व्यवस्था वेगवेगळ्या खोल्यांमध्ये करुन दिली. थोड्याच वेळात फ्रेश होऊन चहा व भजीचा आस्वाद घेऊन जंगल सफारी करिता सगळे सज्ज झाले. ८-८ चे गृप करून नागवेकरांनी जंगल सफारी घडवून आणली. रात्री मत्स्याहारी जेवणावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला . सुरमई फ्राय, तिसऱ्या मसाला व बांगड्याचा रस्सा असा कोकणी जेवणाचा बेत होता. जेवणानंतर सगळे जण स्विमिंग पूल वर एकत्र जमले आणि पुन्हा एकदा सुरांची मैफिल जुळून आली. वर्गमित्र संगीतकार जगदीश घोसाळकर यांनी सुरेल आवाजात कवाली, गीत रामायण व राम कदम यांची मराठी व हिंदी गाणी सादर केली. त्याला लिलाधर खोत व संदीप पाटील यांनी ढोलकी वर साथ केली. ही मैफिल साधारण दीड तास रंगली व अखेर चा हा तुला दंडवत या भैरवी ने सांगता झाली. दुसऱ्या दिवशी शनिवारी दि. १९ रोजी सकाळी ८ वा. बोटिंग करण्यासाठी सज्ज झालो. सुमारे १ तासाच्या नदीतील बोटिंग मध्ये कलावंत विनोदवीर संदीप पावसकर यांनी कोकणी भाषेतील खुमासदार शैलीत कविता आणि किस्से सादर करून खूप छान मनोरंजन केले. त्यांच्या “कोण म्हणतो बेवड्याक मान नाय” या विनोदी कवितेला सर्वांनी दाद दिली. बोटिंग उरकून सर्वांनी सकाळच्या नाश्त्यावर ताव मारला. नागवेकरांनी घावन चटणी आणि थालीपीठ असे चटकदार कोकणी पदार्थ नाश्त्यासाठी दिले. तदनंतर स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेता घेता रेन डान्स मध्ये गोविंदा खेळात सर्व सामिल झाले. अशाप्रकारे स्नानादी उपचार आटोपून सर्व जण सभागृहात गोळा झाले. सर्वप्रथम सहा दिवंगत मित्र व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर प्रत्येकाने स्व परिचय देऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मोरे बाई, डी. पी. पाटील , रौंदळ सर, जाधव सर, तावरे सर, महाजन सर, मालुसरे सर ,पवार सर आदी गुरु जनांच्या रम्य आठवणींमध्ये सगळे हरवून गेले. अन्य गावांतून येणारे जगदीश घोसाळकर, रमेश जाधव, अनंता सावंत, पांडुरंग म्हात्रे, किशोर पवार आदींनी त्यांचे अनुभव कथन करीत आपल्या गुरुजनांविषयी आत्मियता व ऋण व्यक्त केले. असा हा कार्यक्रम दोन तास रंगला. पुनश्च नागवेकरांनी दुपारच्या भोजनात खास रत्नागिरी हापुस आंबा व आमरस पोळी व ओल्या काजुगरांची भाजी व सोलकढी अशा रुचकर पदार्थांनी सर्वांना खुष केले. शेवटी या रम्य आठवणी घेऊन पुढील मेळावा डिसेंबर २०२५ मध्ये घ्यावा व सर्व ४८ जणांना सहभागी करून घ्यावे असा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग, फोटोग्राफी करण्याची जबाबदारी रवींद्र दिवेकर, किशोर पवार, दिलीप चांदोरकर यांनी पार पाडली. विशेषतः उत्तम ओसवाल हा जैन धर्मीय शुद्ध शाकाहारी असूनही तितक्याच उत्साहाने सहभागी झाला. या मेळाव्यात सुर्यकांत पेडणेकर, गजानन पाटील, शाम चांदोरकर, कमलाकांत शिरवटकर, मधुकर शिरवटकर, सुबोध सुर्वे, भिकू लोहार, रमेश जाधव, किशोर पवार, जगदीश घोसाळकर, अनंता सावंत, पांडुरंग म्हात्रे, दिलीप चांदोरकर, संतोष तोडणकर, रवींद्र मोरे, प्रसाद मोरे, जनार्दन सवतीरकर, चंद्रकांत दिवेकर, सतीश दिवेकर, लीलाधर खोत, संदीप पाटील, उत्तम ओसवाल, अनंत भायदे व रवींद्र दिवेकर असे २४ वर्गमित्र सहभागी झाले होते.