सामान्य जनतेला सेवेचा अधिकार मिळवून देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम– जिल्हाधिकारी किशन जावळे
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग- राज्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा या ठरावीक मुदतीत मिळवण्याचा हक्क मिळवून देणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ दशकपूर्ती आणि प्रथम ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक सेवा देणाऱ्या अधिकारी व कार्यालयाचा गौरव करण्यात आला. महसूल विभागाने या अंतर्गत सर्वाधिक 94.36% सेवा दिल्या आहेत. तर उद्योग विभागाने 94.12 आणि कामगार विभागाने 93.53 टक्के सेवा दिल्या आहेत. यावेळी अतिउत्तम कामगिरी करणारे तहसीलदार मुरुड, माणगाव, अलिबाग यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वाना लोकसेवा हमीची शपथ दिली. तसेंच या कायद्याविषयी माहिती देणाऱ्या संदेशाचे लोकार्पण केले.
*थळ ग्रामपंचायत आपले सेवा केंद्र उदघाटन*
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते आदर्श आपले सेवा केंद्र थळ ग्रामपंचायतचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मानसी ताई दळवी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी संपूर्ण कामकाजाची माहिती घेतली. तसेच उपस्थित नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप केले.
