आठवडा बाजाराने अर्थव्यवस्थेला बळकटी

आठवडा बाजाराने अर्थव्यवस्थेला बळकटी

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- ग्राहक ते थेट शेतकरी हि संकल्पना ग्रामीण भागातील आठवडा बाजारात बघायला मिळते. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे पर्याय उपलब्ध झाले तरी पारंपारिक आठवडा बाजार हि संकल्पना मोडीत निघणार नाही.
उलट आरोग्याच्या आणि सध्या बाजारात सुरु असेलेल्या “हेल्थ डायेट” वर हा उत्तम पर्याय मानला जातोय.
कुठलीही प्रक्रिया न करता भाजीपाला/फळे थेट बाजारात येत असल्याने ह्याला खूप मागणी आहे.

कोरोनामुळे व्यावसायाच्या संकल्पनाच बदलल्या. परंतु ग्रामीण भागातील ग्राहकांना हे आधुनिक पर्याय सोयीचे नसल्याने येथील व्यावसायिक, शेतकरी, मच्छीविक्रेत्या महिला पुन्हा पारंपारिक आठवडा बाजाराची कास धरुलागले आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आठवडा बाजाराने रायगड जिल्ह्याच्या अर्थकारणाला पुन्हा बळकटी येऊ लागली आहे.पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हात दाखल होत असल्याने अर्थकारणाला गती मिळत आहे.

आठवडा बाजारात भाजीपाल्यासह, सुकी मासली, मसाल्याचे पदार्थ, मोबाईल असेसरीज, महिलांचे संदर्यप्रसादने,भांडीकुंडी, कपडे अशा सर्वाच प्रकारच्या वस्तु कमी किमतीत मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातीलआठवडा बाजार हे शॉपिंग मॉल ठरू लागले आहेत. सहा दिवस शेतात काम करायचे आणि आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेतात तयार झालेला माल जवळच्याच आठवडा बाजारात स्वतः विकण्याचा रायगड जिल्ह्यातील मध्यम भूधारक शेतकऱ्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. यातून शेतकरी आणि ग्राहकांमधील दरी कमी होत असल्याने ग्राहकांनाही कमी किमतीत ताजा माल मिळू लागला आहे.

कोरोनामुळे कमीत कमी खर्चात व्यवसाय कसा करायचा याबद्दल अनेकांनी धडा घेतल्याने दुकानाचे भाडे,
दुकानाचे लाईटबिल, साठवणुक खर्च अशा प्रकारचे खर्च आठवडा बाजारामुळे टाळता येतात.
सध्या कोरोना निर्बंध उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील आठवडा बाजार कोरोना पुर्वीपेक्षा जास्त स्वरुपात सुरु होत आहेत. जिल्ह्यात आजच्या घडीला लहानमोठे 128 आठवडा बाजार सुरु झाले आहेत.
दोन वर्षात 20 टक्के वाढ झाली असून पुढील काही दिवसात बेगमी खरेदीसाठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यातून प्रत्येक आठवडा बाजाराची आठवड्याला सरासरी उलाढाल 10 ते 15 लाखाच्या दरम्यान होत आहे.काही मोठ्या आठवडा बाजारांची उलाढाल 50 लाखाच्या आसपास होत असते.

***

ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन

आठवडा बाजारातील वसुलीसाठी काही ग्रामपंचायतींमध्ये वर्षासाठी कंत्राटदार नेमले जातात.
दुकानाचा आकार पाहुन 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत दुकानदारांना कर आकारला जातो.
दुकानाचा महिन्याला पाच ते दहा हजार रुपये भाडे भरण्यापेक्षा हा कर खूपच कमी आहे.

वरसोली येथील विठ्ठल मंदिर परिसरात एकादशी बाजार सुरु करण्यात आले आहेत.
देवदर्शनासह गृहिणींना बाजार खरेदी करता येते. अशातून देवदर्शानातून बाजाऱ्हाट ही नवी संपल्पनावजिल्ह्यात रुजू लागली आहे. यातून देवस्थानाचेही उत्पन्न वाढू लागले आहे.

 

***

सुविधा उभारण्यावर भर

ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत असल्याने बाजारात येणाऱ्या दुकानदारांना शौचालय, पिण्याचे पाणी,
सायंकाळच्या दरम्यान वीज पुरवठा अशा सुविधा पुरवण्यासाठी सबंधीत ग्रामपंचायती आपला निधी वापरु लागले आहेत. थळ, पोयनाड येथील मोठ्या बाजारांमध्ये कायमस्वरुपी शेड उभारण्यात आल्या आहेत.
याशिवाय बाजारात येणाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी मोकळी जाता उपलब्ध करुन दिली जात असते.
दर आठवड्याला ठराविक दिवशी यात्रेचे स्वरुप येत असल्याने ग्रामपंचायतींकडूनही आठवडा बाजाराचे
बारकाईने नियोजन केले जाते.

***

फिरती दुकाने वाढू लागली

ज्या विक्रेत्यांकडे स्वतःची वाहने आहेत, असे विक्रेते एक आठवडा बाजार संपल्यावर राहिलेला माल जवळच्या दुसऱ्या आठवडा बाजारात नेऊन विकतात. यामध्ये सुकी मासली, कांदे-बटाटे, कपडे विक्रेते संपुर्ण आठवडाभर मालाची विक्री करतात. अशा प्रकारचे व्यावसायिक एका ठिकाणी स्थिर दुकाने नvथाटता सतत फिरत असल्याने जिल्हाभरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत त्यांना पोहचता येते.

***

कोरोनापुर्वी आमचा अलिबाग बाजारपेठेत दुकान होता. मात्र, भाडे न भरता आल्याने ते बंद करावे लागले.घरात शिल्लक राहिलेला कटलरी सामान फुकट जाऊ नये म्हणून थळ येथील आठवडा बाजारात जाऊन
विकण्याचा प्रयत्न केला. यास चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर थळ, पोयनाड, हटाळे, हाशिवरे या ठिकाणी
जावून कटलरी साहित्य विकतो. फक्त तिथे साहित्य घेऊन जाण्याची अडचण असते.

– सुगंधा पवार, कटलरी विक्रेत्या

***

आमच्या पाच गुंठा जागेत आम्ही उन्हाळी वाल, टॉमेटो, गावठी मिरच्या, कोबी पिकवतो. सहा दिवस शेतात
काम केल्यावर तयार झालेला माल सोमवारी पोयनाड आठवडा बाजारात एकाच दिवशी विकता येते.
स्वतः पिकवलेल्या मालाची विक्री करण्याचा समाधान यातून जास्त मिळतो.

– वासंती पाटील, भाजी विक्रेत्या

***

सुकी मासळी विक्रीसाठी आठवडा बाजार उत्तम ठिकाण आहे. आठवडा बाजारात 25 रुपये भाडेपट्टी भरल्यानंतर दिवसाला 20 ते 30 हजारापर्यंत उलाढाल होते. मे महिन्यात ही आणखी वाढते.आम्ही एक टेंम्पो घेतलाय, या टेम्पोत माल भरुन एका बाजारातून दुसऱ्या बाजारात सहज नेता येते.शिवाय या टेम्पोत जेवण, दुपारच्या वेळेला थोडासा आराम देखील करता येतो.

-जयमाला पेरेकर, मच्छीविक्रेत्या

***

ज्या ग्रामपंचायतीमध्ये नव्याने आठवडा बाजार सुरु करायचा असेल त्यासाठी जिल्हापरिषदेच्या
ग्रामपंचायत विभागाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर तेथील सुविधा उपलब्ध
करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. यासाठी आवश्यक कर वसुलीचे निकष ग्रामपंचायत कायद्यानुसार ठरलेले आहेत.

-राजेद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

***

काही प्रमुख आठवडा बाजार

थळ- रविवार

पोयनाड- सोमवार

हटाळे- गुरुवार

खोपोली- गुरुवार

हाशिवरे- शनिवार

सहाण- रविवार

रोहा- शुक्रवार

वडखळ – शुक्रवार
वरसोली (विठ्ठल मंदिर) –एकादशी व बुधवार