विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षक आता पालकांच्या दारी
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा ठरणार सरस
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- पटसंख्या अभावी रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची अवस्था काही वर्षापासून बिकट होताना दिसत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळांकडे वळविण्यासाठी काही शिक्षकांनी जाहिरात बाजी सुरू केली आहे. आत्ता मुलांना मराठी शाळांमध्येच प्रवेश घ्या असे आवाहन शिक्षक घरोघरी जाऊन करताना दिसत आहेत.
एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यात जागा अपुरी पडत होती. मात्र वेगवेगळ्या कारणामुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.शिक्षकांवर टाकलेली अशैक्षणिक कामे, त्यांचा काही शिक्षकांनी घेतलेला गैरफायदा, सातत्याने बदलत गेलेली महत्त्वाचे पालकांचे म्हणजे नोकरी व्यवसायासाठी स्थलांतर अशा बराच कारणामुळे मराठी शाळांची पदसंख्या घसरु लागली. आज बहुतांशी शाळांमध्ये हाताच्या बोटावर मोजावीत इतकीच मुले शिल्लक राहिली आहेत. असे चित्र असतानाही शिक्षक पटसंख्या वाढावी म्हणून तितकेसे प्रयत्न करताना दिसत नव्हते.
जाहिरातीच्या माध्यमातून मराठी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मेरीटच्या आधारे निवड झालेले शिक्षक, सर्व शासकीय योजनांचा लाभ, मध्यान भोजन योजना, प्रवेशासाठी कोणताही शुल्क नाही, वर्षभर कसलेही शुल्क नाही, आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब या बाबी पालकांना समजावून सांगत आहेत. त्यासाठी गृहभेटीवर भर देण्यात आला आहे.
नोकरी टिकवण्याबरोबरच गरीब पालकांना आधार देण्यासाठी शिक्षकांनी पटसंख्या वाढवून शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी यावेत, पालकांनी मराठी शाळेत मुलांना प्रवेश घ्यावा यासाठी जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा यांच्यातील फरक सांगणारी जाहिरात बाजी सुरू केली आहे.
शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनाच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याची माहिती घेतली.तसेच काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खास करून गृहमंत्र देऊन पालकांचे प्रबोधन केले जात आहे. असे रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे उदय गायकवाड यांनी सांगितले.