अखेर लेखी आश्वासनाने समनक जनता पार्टीचे धरणे आंदोलनास स्थगिती…!

अखेर लेखी आश्वासनाने समनक जनता पार्टीचे धरणे आंदोलनास स्थगिती…!

◾एस.बी.आय.शाखा व्यवस्थापकाने दिले लेखी पत्र

आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243

माहूर तालुक्यातील बँकेच्या कर्जदार शेतकऱ्याच्या पिक कर्जाची सक्तीने वसुली करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेने होल्ड लावले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आपल्या शाखेतील बँक खात्यात पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना व विविध शासकीय अनुदानाच्या रक्कम वर्ग होतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या करिता शासन स्तरावर मागणी सुरु असून शेतकऱ्यांचे बँक खात्यांना लावलेले होल्ड काढणे आवश्यक आहे. तसेच एपीएस सुविधा बंद असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना बँक खात्यातील पैसे काढण्याकरिता शेतातील कामे व रोजगारांची कामे बुडवून खर्च करून यावा लागतो तेव्हा एईपीएस सुविधा तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे.आदी मागण्याबाबत आज माहूर येथील एस.बी.आय. शाखेसमोर समनक जनता पार्टीच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.

भारतीय स्टेट बँक शाखा माहूर च्या शाखा व्यवस्थापकांनी वरील मागण्याच्या अनुषंगाने कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वरील विविध योजनेचे जसे की प्रधान मंत्री आवास योजना, पी एम किसान सन्मान निधी योजना, लाडकी बहीण योजना, वयोवृद्धसाठी बचत खात्यामध्ये आरोग्याच्या सोयीने ठेवलेली रक्कम या सगळ्या रकमेवर रोख लावण्याचा अधिकार रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या आदेशानुसार आम्हा बँकांना आहे.आणि जोपर्यंत हे थकीत शेतकरी आपले बँक खाते व्याजाची रक्कम भरून नूतनीकरण करून घेत नाही तोपर्यंत वरिष्ठांच्या आदेशानुसार कुणाचेही होल्ड करता येणार नाही. असे आदेश आहेत.

समनक जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील असून यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून आम्हाला वरिष्ठटांचे आदेश प्राप्त होईपर्यंत या मागण्यावर कोणताही निर्णय घेता येणार नाही असे लेखी पत्र एसबीआय शाखा माहूरच्या वतीने देण्यात आले आहे.

या वेळी समनक जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.रवी राठोड, तालुका सचिव रमेश जाधव, उपाध्यक्ष नागेश कुमरे, प्रसिद्धी प्रमुख अरविंद राठोड, शेतकरी नेते नंदकुमार संतान, अर्जुन पवार, प्रल्हाद राठोड, आशिष नायक, सचिन चव्हाण, विठ्ठल राठोड, आकाश राठोड, मनोहर जाधव, प्रमोद राठोड, अमोल राठोड यांचेसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधवाची उपस्थिती होती..