गौरीपुजनासाठी बाजारात सुपांना मोठी मागणी

गौरीपुजनासाठी बाजारात सुपांना मोठी मागणी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- गणराया पाठोपाठ येणाऱ्या गौरीला ओवसा देण्यासाठी पारंपारीक सुपांना मागणी वाढलेली दिसत आहे. बांबूपासून बनवलेले सुप भाऊ गौरी-गणपतीत बहिणीसाठी नेतो आणि बहिण त्याचा पाहूणचार करते. तर काही ठिकाणी नवीन नवरीला पाच सुपांचा ओवसा देण्याची पारपांरिक पध्दत रूढ आहे. सुपात फळे, वेगवेगळया फुलांनी व दुर्वा, तुळस, आघाडा, पुरणपोळ्या, कंरजी, आदी साहित्याचा ओवसा गौरीला दिला जातो. यावेळी भाऊ बहिणीला साडीचोळी, बांगडीसाठी पैसे देतो. साजशृंगार, सौभाग्याचे लेण परिधान करून महिला नवऱ्याच्या उदंड आयुष्याची पार्थना करून गौरीची ओटी भरतात. येत्या रविवारी (दि. 31) गौरीचे आगमन तसेच सोमवारी (दि.1) सप्टेंबर रोजी गौरीपुजन असल्याने बाजारात सुपांना मोठी मागणी दिसून येत आहे.

गौरी पुजनाच्या निमित्ताने बाजारात बांबूच्या सुपाची मागणी वाढलेली दिसत आहे. बुरूड समाजाच्या वतीने गणपती उत्सवातील गौरीपुजनासाठी सूप बनविले जातात. गणेश उत्सवापूर्वी बुरूड समाजाच्यावतीने सुप बनविण्याचा प्रक्रियेस सुरूवात केली जाते. बाजारात सध्या 150 ते 200 रूपयांला एक सूप असा दर सुरू आहे. मात्र, बांबूंच्या वाढत्या दरासह वाढलेली मजुरांची मजूरी यामुळे सूप बनविण्यासाठी बुरूड समाजाला खूपच ओढाताण करावी लागत आहे.

सध्या येथील पंचक्रोशीत सातारा जिल्ह्यातील सूप बनविणारे कारागीर आलेले दिसून येतात. येथील शेतकरी व बागायतदारांकडून बांबू खरेदी करून सूप बनविण्याची कला उपयुक्तपणे साकारतात. स्थानिक बाजारपेठेत या कारागिरांनी ठिकठिकाणी बस्तान ठोकेलेले दिसते. परिणाम स्थानिक बुरूड समाजाच्या सूप बनविण्याचा व्यवसायाला स्पर्धक तयार झालेले दिसून येतात. मात्र, किमतीत कोणताही फरक नसून सुपाचा बाजारभाव एकच असल्याचे निदर्शनास येत आहे.