*जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करत ९० डॉक्टरांनी दिले राजीनामे*

यवतमाळ:– करोना वायरसच्या महामारीच्या संकटकाळात यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 90 डॉक्टरांनी सोमवारी राजीनामे दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामे सोपविले.
आज जिल्हात कोरोना वायरसने मोठ्या प्रमाणावर आपले पाय पसरवले आहे. अनेक लोकं मृत्युमुखी पडले आहे. रोज नविन कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळत आहे. अशा संकटकाळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 90 डॉक्टरांनी सोमवारी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत वर्ग एकचे अधिकारी गेल्या सात महिन्यापासून करोना रुग्णाच्या सेवेत आहेत. ‘जिल्हा प्रशासनाकडून बैठकीत वारंवार आमचा अपमान केला जात असून नेहमी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे’ असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. करोना रुग्णांवर उपचार करीत असताना २३ वैद्यकीय अधिकारी व ६७ आरोग्य अधिकारी यांना लागण झाली त्यात एकाचा मृत्यू झाला. असे असताना आमच्या कामाबद्दल सहानुभूती दूरच पण आवश्यक सुविधाही मिळत नाही, असा डॉक्टरांचा आरोप आहे. अपमानास्पद वागणूक बंद करावी, एक दिवस रविवारी सुट्टी मिळावी व रुग्णालयात ५० बेड डॉक्टरांच्या कुटुंबासाठी राखीव ठेवावे, अशा मागण्या घेऊन राजपत्रित संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय अकोलकर, कार्याध्यक्ष डॉ रवींद्र दुर्गे, सचिव डॉ. संघर्ष राठोड, डॉ. आशिष पवार, महिला सचिव डॉ. अर्चना देठे, डॉ. गोपाळ पाटील, यांच्यासह इतर डॉक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यास गेले होते. मात्र निवेदनावर सहानुभूतीने विचार करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप संघटनेने केला. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी काम बंद करून आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले.

*प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.*
गत सहा महिन्यापासून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रशासनाचा प्रयत्न राहिला आहे तर शासन स्तरावर डॉक्टरांच्या मागण्या सोडविण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here