रसायनशास्त्र विभागाद्वारे प्रयोगशाळेतील सुरक्षा या विषयावर कार्यशाळा संपन्न

8

रसायनशास्त्र विभागाद्वारे प्रयोगशाळेतील सुरक्षा या विषयावर कार्यशाळा संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 30 सप्टेंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाद्वारे २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पीएम उषा उपक्रमा अंतर्गत प्रयोगशाळेतील सुरक्षा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एम काटकर यांनी केले. सुरक्षितता हा अतिशय महत्त्वाचा घटक असून त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान सर्व नागरिक, विद्यार्थी यांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी केले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील शशिकांत मोकाशे तसेच नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयातील डॉ. शिबीन चाको आणि डॉ. मयूर खेडकर यांनी तज्ञ प्राध्यापक म्हणून उपस्थिती दर्शविली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा उपप्रचार्य डॉ. एस. व्ही. माधमशेट्टीवार व कार्यशाळेचे संयोजक प्रा. सुनील चिकटे व्यासपीठावर उपस्थित होते. पीएम उषा अंतर्गत प्राप्त निधी विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यशाळांचा कौशल्य विकासासाठी लाभ करून घेण्याचे आवाहन प्रास्ताविकातून डॉ.एस व्ही माधमशेट्टीवार यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम दिनी शशिकांत मोकाशे यांनी आगीचे व्यवस्थापन या विषयावर दृकश्राव्य माध्यम आणि प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सहभागी करून घेतले. आगीचे विविध प्रकार, त्यावर करावयाच्या उपायोजना तसेच आगीच्या प्रसंगी घाबरून न जाता संयमाने वागण्याच्या पद्धती, रेस्क्यू ऑपरेशन याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली. आपण वापरत असलेल्या एलपीजी सिलेंडर बाबत आपण अनभिज्ञ असतो, त्याबाबत असलेली नियमावली सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आगीचे नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक केले.
कार्यशाळेच्या द्वितीय दिनी प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये, रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील विविध रासायनिक पदार्थ हे अत्यंत घातक असून सुरक्षितता बाळगली नाही तर विविध आजार, अपंगत्व, आंधळेपणा, आगीच्या घटना, वेळप्रसंगी मृत्यू सुद्धा ओढवू शकतो असे प्रतिपादन अमेरिकेतील विविध विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्राध्यापक डॉ. शिबीन चाको यांनी केले. विविध रासायनिक प्रक्रिया प्रयोगशाळेत पार पाडताना वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर करावा लागतो त्या रासायनिक पदार्थांची संपूर्ण माहिती एमएसडीएस लेबल वर नमूद केलेली असते. एमएसडीएस लेबल चे वाचन कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
रॉयल सोसायटी द्वारे उत्कृष्ट संशोधनात्मक लेख पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉ. मयूर खेडकर यांनी रसायनशास्त्र प्रयोगशाळेत जी विविध उपकरणे हाताळली जातात त्याबाबतचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आपला अभिप्राय नोंदविला. बीएससी अंतिम वर्गात शिकणारी रोशनी कपूर हीने अनेक माहीत नसलेल्या गोष्टी या कार्यशाळे मुळे माहिती झाल्या असे नमूद केले तर बीएससी अंतिम वर्गात शिकणारी बिलोरी चौधरी हीने यापुढे प्रयोगशाळेत प्रयोग करताना या दोन दिवसीय कार्यशाळेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग आत्मविश्वासाने करता येईल असा अभिप्राय नोंदविला. पदव्युत्तर प्रथम सत्रात शिकणारी कुमारी सुहाना हीने सुद्धा या कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले आणि पीएम उषा अंतर्गत प्राप्त निधीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आमच्या मधील विविध कौशल्य विकसित झाले असल्याचे तिने नमूद केले.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. वंदना खनके, डॉ.रक्षा धनकर, डॉ दिलीप वाहने, डॉ. निरेन कठाळे, डॉ.प्रणव मंडल, आकांक्षा बोमकंठीवार, सिद्धी उपाध्याय, चेतना गवालपंछी, अर्चना रॉय तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद राजेश इंगोले, शिल्पा ठोंबरे, भारती वासेकर, हरिदास देठे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याचे संचालन कविता साहू तर आभार प्रा. सुनील चिकटे यांनी केले.
या उपक्रमाला सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार , राकेश पटेल, जीनेश पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.