Home latest News “आजवर समाजासाठी झिजलो, आता पावसात भिजून हक्कांसाठी लढू – कार्यकर्त्यांचा संकल्प”
“आजवर समाजासाठी झिजलो, आता पावसात भिजून हक्कांसाठी लढू – कार्यकर्त्यांचा संकल्प”
पावसात भिजूनही कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त हजेरी; हक्कांसाठी ठाम निर्धार
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
सफाळे :- जिल्हा स्तरीय आदिवासी हक्क व विचार सभेला रविवारी सफाळे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पावसाचा तडाखा बसत असतानाही कार्यकर्त्यांनी छत्री न धरता सभास्थळी हजेरी लावली. या विचारसभेत आदिवासी क्रांतिकारकांच्या संघर्षशील इतिहासाचे स्मरण करून त्यांच्या लढ्याला न्याय देण्याचा आणि समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक शिनवार डुकले, नारायण सांबरे आणि आदिवासी रत्न काळुराम धोदडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांचा त्याग व लढाऊ परंपरेचे स्मरण करण्यात आले. संपूर्ण सभेमध्ये पूर्वजांनी दिलेली प्रेरणा आजही मार्गदर्शक असल्याचे वातावरण जाणवत होते.
आमदार राजेंद्र गावीत यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाने इतर समाजाच्या घुसखोरीला विरोध केला पाहिजे, असे सांगितले. शहादा येथे निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातूनही विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुनील पऱ्हाड यांनी आदिवासींनी सर्वप्रथम आपली संस्कृती, परंपरा आणि ओळख जपली पाहिजे, असे आवाहन केले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे अंत्यसंस्कार आदिवासी पद्धतीने केल्याचे उदाहरण देत त्यांनी इतर समाजाचे अनुकरण थांबवण्याचे आवाहन केले.
समिती सदस्य वैदेही वाढाण यांनी आदिवासी समाजाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध आयोगाकडे अन्यायाविरोधात दाद मागण्यास उदासीन राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. सभेचे अध्यक्ष टीटीएस एफचे जिल्हाध्यक्ष विलास बेलकर यांनी आदिवासी कर्मचारी चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या योगदानाची नोंद घ्यावी असे सांगितले.
प्रमुख वक्ते प्रा. रोहिदास वाजे, प्रा. धोंगडे, प्रा. सुनील भुसारा, ऍड. सुनंदा बेलकर, प्रा. सुधीर भोईर, जेष्ठ लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्यासह मान्यवरांनी विविध अंगांनी आदिवासी हक्क आणि संघर्षाचे मुद्दे मांडले. भूमपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी पेसा कायद्यांतर्गत होणाऱ्या उल्लंघनांवर टीका केली. आदिवासी जमीन बिगर आदिवासींकडे कशी बेकायदेशीररीत्या जात आहे याबाबत त्यांनी पुरावे सादर केले. जेष्ठ कार्यकर्त्या मीनाताई धोदडे यांनी आदिवासींच्या संघर्षशील इतिहासाची उदाहरणे देत समाजाने विचारधारेत एकजूट ठेवावी, असे आवाहन केले.
सभेमध्ये जल, जंगल आणि जमीन यांवरील अतिक्रमणाला विरोध करणे, आरक्षणातील घुसखोरी थांबवणे, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे तसेच मागण्यांपलीकडे जाऊन संघटित संघर्षातून परिवर्तन साधणे या मुद्द्यांवर सर्वांनी एकमत दर्शविले. आदिवासी सेवक वसंत भसरा यांनी आदिवासी हक्कांवर कोणतेही आक्रमण सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा दिला.
या कार्यक्रमात गजानन पागी, काशिनाथ वरठा, संजय भुयाळ, अरविंद बेंडगा, शैलेश तांबडा, सुधीर घाटाळ, रामदास हरवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय बोबा यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन संजय भुयाळ यांनी केले.
ठाणे, वाडा, तलासरी, विक्रमगड, डहाणू आणि सफाळे परिसरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुसळधार पावसातही अखेरपर्यंत उपस्थिती ठेवून सभेचे वातावरण उत्साहवर्धक केले. ही सभा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी स्पष्ट संदेश होता – “आम्ही हक्कांसाठी लढत आलो आहोत, लढत आहोत आणि पुढेही लढत राहू.”