रायगडची पहिली महिला क्रिकेटपटू रोशनी पारधी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड

6

रायगडची पहिली महिला क्रिकेटपटू रोशनी पारधी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२९३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक अभिमानास्पद क्षण घडला आहे. महाड तालुक्यातील रोशनी रविंद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. अवघ्या सोळा वर्षांच्या वयात राज्यस्तरावरील वरिष्ठ संघात संधी मिळवणारी रोशनी ही रायगड जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

रोशनी पारधी ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA) व महाड येथील एसबीसी क्रिकेट अकॅडमीची खेळाडू आहे. तिच्या खेळात अष्टपैलूपणा असल्याने ती फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वच विभागांत सातत्याने चमक दाखवत आहे.
यापूर्वी रोशनीची निवड महाराष्ट्राच्या १५, १७ व १९ वर्षाखालील गटातील संघांसाठी झाली होती. त्या सर्व वयोगटांत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली.

गतवर्षी झालेल्या आंतरजिल्हा १५ वर्षाखालील स्पर्धेत रोशनीने लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे ती सलामीवीर म्हणून संघाची विश्वासार्ह खेळाडू ठरली आहे. त्याचबरोबर तिच्या जलदगती गोलंदाजीने अनेक फलंदाजांना तंबूत परत पाठवले आहे.

रोशनीच्या कठोर मेहनतीला, दररोजच्या सरावातील शिस्तबद्धतेला आणि सातत्यपूर्ण कामगिरीला ही निवड मिळाल्याचे तिचे प्रशिक्षक आवेश चिचकर यांनी सांगितले. “रोशनीने प्रत्येक पायरीवर आपला खेळ सुधारला. तिच्या प्रगतीत तिचा चिकाटीचा स्वभाव आणि मेहनत मोठी भूमिका बजावते,” असे ते म्हणाले.
रोशनीचे वडील रवींद्र पारधी यांनीही मुलीच्या या यशामुळे अभिमान व्यक्त केला. महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर यांनी रोशनी ही भावी काळात भारतीय संघात खेळेल, असा विश्वास व्यक्त केला.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनी, तिचे पालक तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. “रायगड जिल्ह्यात मुलांच्या बरोबरीने मुलींमध्येही उत्तम गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण व व्यासपीठ देणे हे आमचे ध्येय आहे. रोशनीची निवड याच प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यात ती देशासाठी खेळेल अशी अपेक्षा आहे,” असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रोशनी पारधीच्या या कामगिरीमुळे रायगड जिल्ह्यातील मुलींच्या क्रिकेटला नवे बळ मिळाले आहे. तिच्या यशाबद्दल आरडीसीएचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

रायगडच्या या कन्येने कमी वयात उतुंग भरारी घेत आपल्या जिल्ह्याचे नाव खऱ्या अर्थाने उज्ज्वल केले आहे.