उजाला स्वीट्स चौक-खालापूर, निष्काळजीपणा उघड – अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

8

उजाला स्वीट्स चौक-खालापूर, निष्काळजीपणा उघड – अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

खालापूर :- खालापूर तालुक्यातील उजाला हॉटेल चौक येथील दुकानात वडापाव खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या ताटात मोठी बेपर्वाई समोर आली आहे. वडापावसोबत दिल्या जाणाऱ्या चटणीत मेलेली पाल (सरडा सदृश कीटक) आढळल्याने ग्राहक स्तब्ध झाला. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित दुकानाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी ग्राहक उजाला स्वीट्स येथे वडापाव खाण्यासाठी गेले होते. वडापावसोबत दिलेल्या हिरव्या चटणीमध्ये अचानक काहीतरी विचित्र असल्याचे लक्षात आले. बारकाईने पाहिल्यानंतर त्या चटणीत मेलेली पाल असल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकाने तत्काळ दुकानदाराचे लक्ष वेधले असता, कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र, उपस्थितांनी गोंधळ घातल्याने दुकान व्यवस्थापनाला माफी मागावी लागली.

अन्न पदार्थात अशा प्रकारे कीटक आढळल्याने अन्नसुरक्षेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांनी या प्रकाराचा वफोटो काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने घटना काही वेळातच चर्चेचा विषय ठरली. स्थानिक पातळीवर अनेक नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, अनेक ग्राहक दररोज या हॉटेलमध्ये भोजनासाठी येत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून व्यवसाय केला जात आहे. प्रशासनाने अशा निष्काळजीपणाला वाव दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे नागरिकांनी सांगितले.

या प्रकारानंतर उजाला स्वीट्समध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची कसून तपासणी होईपर्यंत संबंधित दुकान बंद करण्याची मागणी होत आहे.