पावसामुळे शेतकरी संकटात

8

पावसामुळे शेतकरी संकटात

जिल्ह्यातील 400 हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. या पावसात भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 473 हेक्टरहून अधिक भात पीक क्षेत्र बाधित झाले असून, 1 हजार 388 हून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा पावसाने वेळे अधीच हजेरी लावली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाला. शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पेरणी करण्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी रोपे पाण्यात कुजून गेली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार करून लावणीला सुरुवात केली. परंतु, यंदा रोपे कमी पडल्याने शेतीचा काही भाग लावणीविनाच राहिला असल्याचे चित्र दिसून आले. यावर्षी भात पिक तयार झाले. काही ठिकाणी कापणीसाठी शेतकरी सज्ज झाले होते. काही ठिकाणी भातांच्या रोपांना कणश्या आल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे केले आहे. शेत पाण्याने भरली. तयार झालेली रोपे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 27 व 28 सप्टेंबर असे दोन दिवस पडलेल्या पावसात 473 हेक्टरहून अधिक भात पिकांच्या क्षेत्राचे नुकसान झाले. अलिबाग, पेण, खालापूर, उरण, सुधागड (पाली), श्रीवर्धन, महाड आदी तालुक्यातील 83 हून अधिक गावांतील एक हजार 388 हून अधिक शेतकऱ्यांना या पावसामुळे फटका बसला. या शेतकऱ्यांचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 26 गावांतील 747 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. 236 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तालुक्यातील खारेपाठ विभाग परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फटका बसला असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी तथा मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी दिली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत. शेतांवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

रब्बी हंगाम लांबणीवर?
जिल्ह्यात सतत पाऊस सुरु राहिल्यास जमीनीत ओलावा कायम राहिल. त्यामुळे रब्बी हंगामात होणाऱ्या पिकांची लागवड करण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कांदा, इतर भाजीपाला पिकांची लागवड एक महिना उशीरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
26 दिवसात 24 हेक्टरचे नुकसान
जिल्ह्यामध्ये एक ते 26 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये दहा गावे बाधित झाली आहेत. 24.1 हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 81 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरु झाला. तब्बल पाच महिने पाऊस पडला आहे. भातपिक कापणी योग्य तयार झाले आहे. कापणीची तयारी ठेवण्यात आली होती. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. शेत पाण्याने भरली आहेत.तयार झालेले भातपीक आडवे पडले आहे. त्यामुळे भात पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे. हातातोंडाशी आलेले घास जाण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुुरू राहिल्यास भात पिकांचे नुकसान होणार असून रब्बी हंगामदेखील लांबणीवर जाईल.

कृष्णकांत पाटील
शेतकरी वाघ्रण

दोन दिवस झालेल्या पावसात 33 टक्के पेक्षा अधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांमार्फत नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु केले आहे.

प्रविण थिगळे,
उपसंचालक कृषी विभाग