ढगाळ वातावरणाचा परिणाम तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा हल्ला; बळीराजा पुन्हा संकटात!
वर्धा :- गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. शेतकरी उपाययोजना म्हणून तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे, पण तरीसुद्धा अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने तत्काळ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी आंतर पीक म्हणून कपाशी व तुरीच्या पिकात तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. जिल्ह्यात 55 हजार हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तुरीचे पीक फुलोऱ्यावरच असताच गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. हिरवी अळी तीन ते चार इंचाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
यंदा कापूस, सोयाबीन पीक कीडरोगाने हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. शिवाय हे पीक कमी खर्चाचे असून हमखास उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे. ते शेतकरी तुरीचीच पेरणी करतात.
ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव वाढला असून फुले करपत आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. सद्य:स्थितीत शेतकरी तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. कृषी विभागाने वेळीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.