कर्नाटक सरकारला महाराष्ट्राचे ४० गाव कसे काय आठवले?
रमेश लांजेवार
मो:9921690779
नागपूर: भारत देश एक आहे आणि राहील यात दुमत नाही.परंतु देशातील राज्यात सीमा वाद हा तमाशा कशाला हवा? कारण आपल्या पुर्वजांनी भारत स्वातंत्र्यासाठी 150 वर्षे इंग्रजांशी लढा दिला.त्यानंतर भारत स्वतंत्र झाला.तरीही गोव्या सारख्या केंद्र शासीत प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.गोवा ताब्यात घेण्यासाठी स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षे लागली व 19 डिसेंबर1961 ला पोर्तुगीजांपासुन गोवा मुक्त झाला.अशाप्रकारे भारतात एक-एक राज्य सहभागी करण्यासाठी देशाला मेहनत घ्यावी लागली आणि आता फक्त राजकारणापोटी महाराष्ट्रा-कर्नाटक सिमा विवाद सुरू आहे.या विवादामध्ये काहीही तथ्य नाही.परंतु राजकीय पुढारी व पक्ष आपले राजकारण टिकवून ठेवण्यासाठी सिमा विवादचा ढिंढोरा सर्वसामान्यांसमोर मांडतांना दिसतात.
प्रत्येक राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत यात बेरोजगारी, शिक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्य, उद्योग अशा गोष्टींवर लक्ष देवून ते तत्परतेने सोडविले पाहिजेत जेणेकरून राज्यातील जनतेला समाधान मिळेल व विकास होईल.महाराष्ट्राने आजवर बेळगावसह इतर भाग मिळावेत यासाठी न्यायालयीन लढा दिला आणि सुरू सुध्दा आहे.परंतु कर्नाटकातील कोणताही भाग महाराष्ट्राला मिळाला नाही आणि मिळणार सुध्दा नाही. कारण हे सर्व नाटक राजकीय पुढारी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी करीत असतात. राज्याचा सिमावाद किंवा कर्नाटकचा महाराष्ट्रातील 40 गावांनवरील दावा हा पुर्णपणे राजकीय प्रेरीत असल्याचे दिसून येते आणि ह्या सर्व घटना देशातील इतर राज्यांतील निवडणुका पाहून हा प्रश्न कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मुद्दाम उपस्थित करीत असल्याचे वाटते.
कर्नाटक-महाराष्ट्र सिमा विवाद म्हणजे भारत-पाकिस्तान विवाद नाही ही बाब राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक राज्यांनी आपापल्या राज्याच्या भागाचा विकास करावा यातच खरी माणुसकी दिसून येईल.त्याचप्रमाणे दोन्ही राज्यांतील राजकीय पुढाऱ्यांनी आप-आपले गाव दत्तक घ्यावे व त्याचा विकास करावा.कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने सिमा विवादाला जास्त चालना देवून दोन्ही राज्यांच्या नागरिकांच्या भावना दुखावु नये किंवा भडकवु नये.राज्यात सध्याच्या परिस्थितीत फक्त खोक्याचे राजकारण दिसून येते.त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना महाराष्ट्राकडुन 40 खोके तर पाहिजे तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.कारण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात विकासापेक्षा खोक्याचेच राजकारण सुरू आहे.
त्यामुळे माझ्या मते देशातील कोणत्याही राज्याचा सीमा विवाद नकोच असेल तर तो सामंजस्याने सोडवीला पाहिजे यात राजकारण नको.देशातील प्रत्येक व्यक्ती भारत भ्रमण करतो अशा परिस्थितीत तो व्यक्ती प्रत्येक राज्यात व गावात जातो आणि त्याला प्रत्येक राज्यात मानसन्मान सुध्दा मिळतो मग कशाला हवा सीमा विवाद? त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला विनंती आहे की दोन्ही राज्यांनी सीमा विवादाकडे लक्ष न देता राज्याच्या व राज्यातील जनतेच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले तर बरे होईल.कारण यातच सर्वांची भलाई आहे.
मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
मीडियावार्तच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आणि रोजगार अपडेट्स व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी क्लिक करा ⬇️
https://linktr.ee/mediavarta