अमेरिकेला रक्तबंबाळ करणारी कीड…

72

अमेरिकेमध्ये गोळीबारीच्या घटना आणि त्यामुळे होणाऱ्या हत्यांचे प्रमाण जास्त का आहे? मास शूटिंग रोखण्यासाठी काय उपाय चालू आहेत?

मनोज कांबळे:विचार करा तुम्ही  अमेरिकेतील एका विकसित, धनसंपन्न शहरामध्ये स्वतःच्या मालकीच्या घरात राहताय. तुम्ही आपल्या स्वतःच्या आलिशान गाडीतून आपल्या मुलांना शहरातील एका उत्तम शाळेत सोडून आता पुढे खरेदीसाठी शहरातील एका आलिशान मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेला आहात… आणि अचानक तुम्हाला ऍम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाडीचा कर्णकर्कश आवाज ऐकू येतो. सर्वत्र एकच गोंधळ उडतो. भेदरलेली माणसे घाईघाईत आपल्या गाडीतून शहरातील त्या मोठया शाळेकडे जायला निघतात…आणि तेवढ्यात तुम्हाला कळते कि तुमच्या मुलांच्या शाळेत एक व्यक्ती विध्वसंक सैनिकी गन घेऊन घुसला आहे आणि तो शाळेमधील निष्पाप मुलांवर अंधाधूंद गोळ्या झाडत आहे. त्या लहानग्यांच्या किंचाळण्याच्या आवाजाने शहर हादरत आहे.    हि परिस्थिती थरकाप उडवणारी आहे ना. पण हे काही एखाद वाईट स्वप्न नाही आहे, तर अमेरिकेतील एक मोठं भयानक सत्य आहे. अमेरिकी समाजाला लागलेल्या एका किडीचे भयानक सत्य…

हि कीड आहे अमेरिकेतील मास शूटिंगची. एक माथेफिरू व्यक्ती शहरातील शाळा, मॉल, मार्केट, हॉटेल मध्ये तीव्र युद्धांमध्ये वापरण्यात येणारी गन घेऊन शिरतो, आणि जमलेल्या लोकांवर डोळे झाकून काही क्षणात शेकडो गोळ्या झोडून मोकळा होतो, शेकडो लोक एका क्षणात आपले प्राण गमावतात. चिंताजनक गोष्ट म्हणजे अशा घटना अमेरिकेत सर्रास घडतात. इतक्या कि २०२२ मध्ये अशा गोळीबाराच्या घटनांमध्ये तब्बल ४५,२२२ अमेरिकी नागरिकांची हत्या झाली होती. एफबीआयच्या मते, २०१९ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये 16,४२५ खून झाले होते, ज्यापैकी 10,२५८  (62.4%) बंदुकांसह करण्यात आले होते. २०२२  मध्ये, अमेरिकेत  ५६५ पेक्षा जास्त सामूहिक गोळीबार झाला, ज्यामुळे ५९७  मृत्यू आणि २ ,३८० नागरिक जखमी झाले. २०२३  मध्ये, २६ ऑक्टोबरपर्यंत, यूएसएमध्ये बंदुकीच्या हिंसाचारात 35,२७५ पेक्षा जास्त लोक मारले गेले होते, त्यापैकी 1,१७३  पोलीस अधिकारी-निगडित गोळीबारात ठार झाले होते.गन वायलेन्स आर्काइव्हनुसार, २०२२  मध्ये 6,०००  हून अधिक मुले (वय 17 आणि त्यापेक्षा कमी वयाची) गोळीबारात मारली गेली. त्यापैकी 306 मुले (वय ११ आणि त्यापेक्षा लहान) आणि 1,३२३ किशोर (वय १२ -१७) गोळीबारात मारली गेली. याचा अर्थ असा की २०२२ मध्ये 1,629 मुले आणि किशोरवयीन मुलांचा गोळीबारात मृत्यू झाला, जो त्या वर्षातील एकूण बंदूक हिंसाचार मृत्यूंपैकी 3.7% आहे.

अमेरिकेतील बंदूक समस्या हा एक जटिल आणि वादग्रस्त विषय आहे. ज्यामध्ये समाज, राजकारण, संस्कृती आणि मानवी हक्कांच्या अनेक पैलूंचा समावेश आहे. यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे अमेरिकेत साध्या रिव्हॉल्वरपासून ते विध्वसंक लष्करी गन नागरिकांना कोणत्याही चौकशी, निर्बंधांशिवाय सहज विकत घेता येऊ शकतात. Giffords Law Center च्या मते, युनायटेड स्टेट्समध्ये कोणतीही राष्ट्रीय बंदुक नोंदणी नाही आणि फेडरल कायद्यानुसार बंदुकीच्या शोमध्ये किंवा ऑनलाइन बंदुकांच्या खाजगी विक्रीसाठी खरेदीदारांची पार्श्वभूमी तपासण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अमेरिकेत स्वतःकडे गन बाळगणाऱ्या नागरिकाचे प्रमाण इतर राष्ट्रांच्या तुलनेत जास्त आहे.  प्यू रिसर्च सेंटरच्या मते, सुमारे दहापैकी चार अमेरिकन म्हणतात की त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या बंदूक आहे किंवा ४८% लोक म्हणतात की ते बंदुका असलेल्या कुटुंबात वाढले आहेत. २०२३ पर्यंत, युनायटेड स्टेट्समध्ये अंदाजे ७७.४९ दशलक्ष प्रौढ बंदूक मालक आहेत.अतिरिक्त 36% प्रौढ लोक भविष्यात बंदूक मालकीचा विचार करतात. सरासरी, एका अमेरिकन बंदूक मालकाकडे पाच बंदुका असतात, जरी जवळपास २२% बंदूक मालकांकडे फक्त एकच बंदुक असते.अमेरिकेतील विक्री झालेल्या बंदुकांची एकूण संख्या सुमारे ४६६ दशलक्ष आहे, ज्यामध्ये फक्त नोंदणीकृत गन्सचा समावेश आहे. नोंदणीकृत नसलेल्या गन्सची संख्या मोजल्यास हि संख्या अजून वाढू शकते.  बंदुकांच्या या मोठ्या संख्येने युनायटेड स्टेट्सला दरडोई सर्वाधिक बंदुकांचा देश बनवतो, येथे प्रत्येक १०० नागरिकांमागे अंदाजे १२० बंदुक आहेत.

बंदुकांच्या सर्रास खरेदी- विक्री मार्केट तयार होण्यामागे अमेरिकेच्या राज्यघटनेतील एका विधेयकाचा आधार आहे. सेकंड अमिडमेंट अमेरिकन नागरिकांना स्वःताच्या संरक्षणासाठी शस्त्रे खरेदी करण्याची आणि बाळगण्याची परवानगी देते. गन विरोधी आणि गन समर्थक याच विधेयकाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावतात आणि त्यातून कोणतेही अंतिम ठराव पास करण्यात अमेरिकन प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे सध्या बंदुकांचा वापर करून होणाऱ्या हिंसाचार आणि आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. गन विरोधी गटाचे म्हणजे आहे कि, अमेरिकेतील गन विक्रीवर कडक निर्बंध लादून गन मालकांची सखोल चौकशी करूनच त्यांना योग्य कारण असेल तरच गन वापर करण्याची परवानगी द्यावी. अन्य लोकांकडे असलेल्या गन सरकारने कारवाई करून आपल्या ताब्यात घ्याव्या. या गोष्टीला गन समर्थकांचा विरोध आहे. गन मालकांची सखोल चौकशी करूनच गन विक्री करावी याबाबत ते काही प्रमाणात सहमत आले तरी, आपल्या गन सरकारकडे जमा करण्यात अनेक गन मालकांचा विरोध आहे. तसेच या वादावर राजकीय, धार्मिक आणि प्रादेशिक विश्वासांचा पगडा असल्याने हा प्रश्न अधिकाधिक जटिल होत आहे.

अमेरिकेमध्ये गोळीबारीच्या घटना आणि त्यामुळे होणाऱ्या हत्यांचे प्रमाण जास्त का आहे?

बंदुकांची सुलभ विक्री: USA कडे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त गन्स आहेत. लोकांना चौकशी  किंवा पार्श्वभूमी तपासण्याशिवाय बंदुका विकत घेण्याची परवानगी दिली जाते. यामुळे हिंसक हेतू असलेल्या किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना, तरुण लोकांना, गुन्हेगारांना बंदुक मिळवणे आणि वापरणे सोपे जाते.

मानसिक आरोग्याने त्रस्त नागरिक: अमेरिकेत समाजामध्ये  मानसिक आरोग्य हि फार मोठी समस्या बनली आहे. काहींना त्यांच्या बालपणात गैरवर्तन, दुर्लक्ष, गुंडगिरी किंवा इतर प्रकारच्या आघाताचा अनुभव आला आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होऊ होतो. असे नागरिक  समाजापासून अलिप्त, रागावलेले, हताश किंवा सूडबुद्धीने राहतात. अशातच सहज बंदूक मिळत असल्याने बहुतेक हा राग मास शूटिंगच्या स्वरूपात गोळीबार करून काढतात.

सामाजिक-सांस्कृतिक विवाद : अमेरिका हा देश जगभरातून वेगवेगळ्या देशांतून स्थलांतरित झालेल्या  लोकांच्या वेगवेगळ्या गटांच्या भिन्न मूल्ये, श्रद्धा, स्वारस्ये,ओळ, धर्म आणि संस्कृतीने बनला आहे. त्यामुळे  वर्णवादी, ड्रुग्स क्राईम, धार्मिक कट्टरता यासारख्या समस्या उफाळून येतात. अशावेळी या भावांच्या आहारी जाऊन अनेक गुन्हेगारांकडून दुसऱ्या गटाच्या, धर्माच्या, वर्णाच्या नागरिकांवर असे हल्ले केले जातात.  

मास शूटिंग रोखण्यासाठी काय उपाय चालू आहेत?

बंदुक खरेदी विक्री कायदे, नियम बळकट करणे: या कायद्याच्या आधारे मानसिक आरोग्याने त्रस्त, गुन्हेगार आणि तरुणांना बंदूक तसेच इतर प्राणघातक शस्त्र विकणे यावर बंदी घालता येऊ शकते. बंदूक किंवा प्राणघातक शस्त्र विकताना खरेदीदारांची चौकशी, गरज, सांभाळण्याची क्षमता इत्यादी गोष्टींची शासनाने तपासणी करणे आवश्यक केले पाहिजे. तसेच अवैध शस्त्र विक्रीवर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.   

मानसिक आरोग्य सुधारणे: चौकशी अंतर्गत हे समोर आले आहे कि, बहुतेक मास शूटिंग करणारे आरोपी हे मानसिक आरोग्याने त्रस्त असतात. जसे की नैराश्य, चिंता, मनोविकृती, व्यक्तिमत्व विकार किंवा अंमली पदार्थांचे सेवन, ज्यामुळे त्यांचे वागणे, समाजाप्रती सहानुभूती आणि सामाजिक कौशल्ये यावर विपरीत परिणाम   होतात. अशा लोकांसाठी समुपदेशन, थेरपी, औषधोपचार, आणि आत्महत्या प्रतिबंध यासारख्या आवश्यक असलेल्या सोयी शासनाने सहज उपल्बध करून देणे गरजेचे आहे.

बातमीचे सनसनाटीखेज प्रसारण: गोळीबाराच्या घटनेचे मीडियाकडून सनसनाटीखेज प्रसारण केले जाते एकीकडे, ते या समस्येबद्दल लोकांना माहिती देऊ शकते, शिक्षित करू शकते आणि जागरुकता वाढवू शकते आणि ते पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्थन, सहानुभूती प्रदान करू शकते. दुसरीकडे, संभाव्य आरोपीना असे गुन्हे घडवून आणण्यासाठी प्रेरित देखील करू शकते.  घटनांचे नाट्यमय रूपांतरण करणे, सतत या घटनांचे विडिओ, पोस्ट प्रमोट करत राहणे यासारख्या गोष्टी गुन्हेगारांना कधीकधी गुन्हेगारीकडे  अधिकच ढकलतात.   

अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये मास शूटिंगचा धोका इतका वाढला आहे कि, शाळा, ऑफिसमध्ये मास शूटिंगमध्ये स्वतःला कसे वाचवायचे याचे खास प्रशिक्षण अगदी बालवाडीतील मुलांपासून जेष्ठ नागरिक यांना दिले जात आहे. मोकळया मनानें शिकणाऱ्या लहान मुलांच्या शाळा कुपन, जाळ्यांनी घेतल्या गेलेल्या आहेत. शाळेत आधुनिक सैनिकी बंदुकांच्या सज्ज पहारेदार उभे आहेत. दुसरीकडे गन समर्थक आणि गन विरोधक यांच्यामधील दुरी वाढतच आहे आणि त्यामुळे अमेरिकेला लागलेली मास शूटिंगची कीड अमेरिकेला पोखरून रक्तबंबाळ करत आहे.