जगातील सर्वात प्राचीन मंदिर: गोबेक्ली टेपे

मनोज कांबळे: गोबेक्ली टेपे हे तुर्कीमधील एक प्राचीन पुरातत्व स्थळ आहे जे अंदाजे १२,०००  वर्षे जुने आहे. ९,६०० आणि ८,२००  बीसीई पूर्व-पाषाण कालखंडातील या वास्तूचे वैशिष्ट्ये म्हणजे हे जगातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. परंतु हे कुणी बांधले ? हा मोठा प्रश्न जगभरातल्या इतिहास अभ्यासकांना पडला आहे. कारण १२,००० वर्षांपूर्वी मानव हा भटकी प्रजाती म्हणून जगात होता, आणि एक ठिकाणी स्थायिक राहणे, एवढी भव्य वस्तू उभारणे आणि शेती करणे यासारखी कौशल्ये त्याकाळी विकसित झाली नव्हती. मग गोबेक्ली टेपे कुणी आणि कसे बांधले? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे बांधलेले मंदिर अचानक जाणूनबुजून मातीच्या ढिगाऱ्याखाली लपवून का ठेवले असेल? आदिमामानवाच्या विकासाबद्दल एक रहस्य गोबेक्ली टेपे मंदिराच्या इतिहासात दडलेले आहे.

Göbekli Tepe, ज्याचा अर्थ तुर्की भाषेत “पोटबेली हिल” आहे, दक्षिण-पूर्व अनातोलियाच्या जर्मुस पर्वतांमध्ये, शानलिउर्फा शहराजवळ आहे. हि सुमारे ८ हेक्टर (२० एकर) क्षेत्र व्यापते आणि मोठ्या दगडी खांबांनी बनवलेल्या अनेक गोलाकार आणि आयताकृती आच्छादनांचा समावेश आहे. त्यापैकी काही खांब ५.५  मीटर (१८ फूट) पर्यंत उंच आणि १०  टन पर्यंत वजनाचे आहेत. खांब एकाकेंद्रित वलयांमध्ये मांडलेले आहेत, प्रत्येक आवाराच्या मध्यभागी दोन मोठे सुशोभित केलेले खांब आहेत. खांबांवर सिंह, बैल, कोल्हे, साप आणि पक्षी, तसेच अमूर्त चिन्हे आणि मानव, प्राण्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. काही खांबांवर कपड्यांचे चित्रण देखील आहे, जसे की कमेराचा पट्टा आणि अंतवस्त्र. या वास्तूभोवतीची तटबंदी दगडी भिंती आणि बाकांनी वेढलेली आहे आणि त्यांपैकी काहींना दगडी द्वार किंवा प्रवेशद्वार आहेत. या ठिकाणी निओलिथिक आणि नंतरच्या कालखंडातील असंख्य लहान इमारती, खाणी आणि टाके आहेत.

हि वास्तू  ज्या कालखंडात  बांधली गेली त्यावेळचा मनुष्य हा शिकारी टोळ्यांनी राहत होता. शिकार करत एका जागेतून दुसरीकडे भटकत राहणे, अशी त्यांची जीवनशैली होती. धातूचापासून वस्तू बनवणे, शेती करणे यासारखी विकसित कौशल्ये त्याला अवगत नव्हती. धर्म, सामाजिक व्यवस्था, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र याबाबतीत मानव त्याकाळात अज्ञानी होता.असे आजवरचा इतिहास आपल्याला सांगतो. मग असे असताना इतकी प्रचंड आकाराची आणि गुंतागुंतीची संरचना असणारी वास्तू मानवाने अचानक कशी तयार केली? गोबेक्ली टेपे वास्तूच्या अभ्यासानंतर समजते कि, या वास्तूचा वापर धार्मिक, सामाजिक कामांसाठी,  मेळावे, समारंभ आणि मेजवानीसाठी केला जात असावा. याचा अर्थ गोबेक्ली टेपे वस्तू बांधण्याच्या आधी मानवाला धर्मची, देव देवतांची कल्पना कळली होती, खगोलशास्त्र आणि भूमिती आणि स्थापत्यशास्त्र  याचे अत्याधुनिक ज्ञान त्याने संपादन केले होते, सामाजिक संस्था आणि सहकार्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाली होती. असे असेल तर, आजवर आदिमानवापासून प्रगत मानवापर्यंत मानव प्रजातीचा विकासाच्या इतिहासात काही मोठ्या गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या आहेत कि काय? अशी शंका उत्पन्न होते.

आज गोबेक्ली टेपे वास्तूचा जगभरती इतिहासकार, भूवैज्ञानिक यांच्याकडून अभ्यास चालू आहे. वास्तू भॊवतीही  तटबंदी आणि खांबांचा उद्देश काय होता? तेथे कोणत्या प्रकारचे विधी आणि कार्यक्रम घडले? वास्तू तयार आणि वापरणारे लोक कोण होते? त्यांचा इतर प्रदेशातील मानवी गटांशी संबंध होता का? या वास्तूचा एकूण मानवी  संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासावर कसा प्रभाव पडला? या प्रश्नाची उत्तरे शोधली जात आहेत. त्यासाठी  रेडिओकार्बन डेटिंग, भूचुंबकीय सर्वेक्षण, सूक्ष्म पुरातत्व आणि DNA विश्लेषण यासारख्या विविध पद्धती आणि तंत्रांचा वापर केला जात आहे. गोबेक्ली टेपे वास्तूबद्दल अजून एक महत्त्वाची बाब जी अभ्यासकांना मोठ्या कोड्यात टाकते ती म्हणजे, गोबेक्ली टेपेच्या वास्तूचे आणि सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केल्यानंतर समजते जी हि वास्तू त्याकाळी मानवणारी मुद्दामहून मातीखाली गाडली होती. मात्र वास्तू गाडताना आतील बांधकाम, कोरीव नक्षीकाम यांना अजिबात धोका पोहचणार नाही याची काळजी घेण्यात आलेली होती. असे का केले गेले असेल? आपल्या जिवनशैलीबद्दल पुढच्या पिढयांना कळावे म्हणून गोबेक्ली टेपे बांधणाऱ्या मानवी गटाने समाधीच्या स्वरूपात या वस्तूला मातीखाली काळजीपूर्वक गाडले होते? कि या ठिकाणी मानला जाणारा धर्म किंवा देव देवता यासंदर्भातील एक रूढी, परंपरा म्हणून असे केले असेल? याबाबाबत अभ्यास चालू आहे.

https://mediavartanews.com/2023/11/29/gun-violence-problems-in-usa-and-its-solution/

 

गोबेक्ली टेपे मंदिराच्या या रहस्यमयी कोड्यामुळे जगभरात अनेक दंतकथाचा मात्र उगम झाला आहे. या दंतकथा आणि किंवा खोटे समाज इंटरनेटवर चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. त्यातील एक समज म्हणजे गोबेक्ली टेपे ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे जी तारे आणि ग्रहांच्या हालचाली, धूमकेतूंचे ठिकाण यांची नोंद करण्यासाठी मानव वापरात होता. परंतु गोबेक्ली टेपेचा वापर खगोलशास्त्रीय हेतूंसाठी केला गेला होता किंवा धूमकेतूच्या प्रभावाशी त्याचा काही संबंध आहे याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. वास्तूमधील खांब आणि त्यावरील संरेखन कोणत्याही ज्ञात खगोलीय घटनांशी सुसंगत नाहीत आणि प्राण्यांचे आकृतिबंध कोणत्याही ज्ञात नक्षत्रांशी सुसंगत नाहीत असे आढळून आले आहे. आजवरच्या अभ्यासात हि वास्तू  वैज्ञानिक निरीक्षणासाठी नव्हे तर धार्मिक विधी आणि सामाजिक मेळाव्यासाठी वापरली जात असावी, असे समोर आले आहे. प्राचीन सुमेरियन देवता अनुनाकी यांच्या उगमाचे स्थान गोबेक्ली टेपे आहे. या देवतांनी मानवतेला सभ्यता आणि शेती शिकवली असे मानले जाते. खरेतर सुमेरियन संस्कृतीचा उगम हा गोबेक्ली टेपे वास्तूच्या बांधकामानंतर  हजारो वर्षानंतर शेकडो किलोमीटर दूर अंतरावर झाला. त्यामुळे गोबेक्ली टेपे आणि सुमेरियन संस्कृती यामध्ये काही संबंध असावा याबाबतचा कोणताही पुरावा सापडत नाही. आधुनिक मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेल्या एलियन्सचा संबंधही इथे जोडला जातो. गोबेक्ली टेपे एलियन किंवा या आधी पृथ्वीवर होऊन गेलेल्या प्रगत मानवी सभ्यतेने बांधले होते जे प्रलयमुळे नष्ट झाले होते, असा काही गैरसमज आहे. या सिद्धांताला कोणत्याही पुराव्याचा आधार नाही.

गोबेक्ली टेपे वस्तूमुळे जगभरातील इतिहासकार आणि विद्वानांमध्ये मानव प्रजातीच्या विकासाच्या इतिहासाबाबत अनेक चर्चा आणि वादविवाद चालू आहेत. क्लॉस श्मिट, या जागेचे मूळ उत्खनन करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात कि,  गोबेक्ली टेपे ही एक धार्मिक वस्तू होती, ज्यांचे बांधकाम त्या भागातील भटक्या मानवी टोळ्यांनी केला होता. परंतु या भटक्या मानव गटांनी अद्याप शेती किंवा कायमस्वरूपी वसाहती विकसित केल्या नव्हत्या. श्मिट यांनी या वास्तूला “जगातील पहिले मंदिर” म्हटले आणि असे सुचवले की ते वापरल्यानंतर जाणूनबुजून आणि विधीपूर्वक या वास्तूचे दफन केले गेले होते. ली क्लेअर, सध्या गोबेक्ली टेपे येथे उत्खननाचे काम पाहणारे, असा युक्तिवाद करतात की गोबेक्ली टेपे हे एक रहिवासी निवासस्थान होते. जो वास्तूमधील घरगुती संरचना, पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि घरगुती वापराशी संबंधित निओलिथिक साधने यासारख्या अलीकडील समोर आलेल्या निष्कर्षांवर आधारित होता. क्लेअर या कल्पनेलाही आव्हान देतात की ही वास्तू मुद्दाम दफन केलेली नसून ती नैसर्गिक कारणांमुळे जमिनीखाली दफन झाली होती. ग्रॅहम हॅनकॉक सारखे काही वादग्रस्त लेखक, असा दावा करतात की गोबेक्ली टेपे ही शेवटच्या हिमयुगाच्या समाप्तीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नष्ट झालेल्या मानवी सभ्यतेचे अवशेष होते.हँकॉक यांनी असाही युक्तिवाद केला आहे की ही वस्तू मुद्दाम पुरून टाकण्यात आली होती जेणेकरून ती एखाद्या प्रलयकारी घटनेपासून या प्राचीन ज्ञानाचे जतन व्हावे आणि भविष्यातील पिढयांना त्याचा अभ्यास करता यावा.

गोबेक्ली टेपेच्या बाबतीत अभ्यास आणि संशोधन जसेजसे वाढत जाईल तसे नवनवीन युक्तिवाद मांडले जातील. त्यातले काही वादग्रस्त असतील, तर काही बारकाईने विचार करण्याजोगे असतील. परंतु यादरम्यान मानवाचा आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास याबद्दल अनेक दुर्लक्षित गोष्टी आपल्याला उजेडात आलेल्या दिसतील. त्यामुळे जगातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाणारे गोबेक्ली टेपे येणाऱ्या काळात मानवी कुतूहलाचा विषय बनून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here