भारतीय संविधानाचा गौरव — आदर्श महिला महाविद्यालयात उत्साहात कार्यक्रम

20

भारतीय संविधानाचा गौरव — आदर्श महिला महाविद्यालयात उत्साहात कार्यक्रम

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान गौरव दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे समन्वयक डाॅ. योगेश लोखंडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्मिती, भारतीय नागरिकांना मिळणारे मूलभूत हक्क तसेच देशाप्रती नागरिकांची कर्तव्ये या विषयांवरील मार्गदर्शनाने झाली. या विषयावर सहा. प्रा. कविता जाधव यांनी विद्यार्थिनींना अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

यानंतर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी कोमल उत्तम शिंदे हिने भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले तसेच उपस्थित सर्व विद्यार्थिनींकडून उद्देशिका वदवून घेतली. राष्ट्रीय मूल्यांची जपणूक आणि संविधानिक कर्तव्यांची जाणीव जागवणारा हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला.

अध्यक्षीय भाषणात डाॅ. योगेश लोखंडे यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, विशेषतः सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या तत्त्वांबरोबरच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत संकल्पनांचे सविस्तर विवेचन केले. विद्यार्थिनींनी भविष्यात सुजाण आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून उभे राहण्यासाठी या मूल्यांचे मनन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी रा.से.यो. विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. स्वरांगी दवटे हिने उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी प्रा. तृप्ती विचारे, प्रा. ऋषिकेश चोगले, प्रा. निखत राजपुरकर, जस्मिन कदम, श्री. दिनेश भुसाने, श्री. केदार जोशी, प्रिया पवार, श्री. प्रभाकर चोगले, सौ. मनिषा श्रीवर्धनकर, श्री. आकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

कार्यक्रमानंतर २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.