निवडणुकीला वळण! कर्जतला अजित पवारांची एंट्री आणि राजकारणात खळबळ

120

कर्जतच्या निवडणूक समीकरणांना मोठा कलाटणी

संदेश साळुंके 

कर्जत रायगड 

९०१११९९३३३ 

कर्जत: नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्जतमधील राजकारण आज अक्षरशः पेटले. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या कॉर्नर सभेने कर्जतच्या निवडणूक समीकरणांना मोठा कलाटणी देत राजकीय वातावरण तापवले. सकाळपासूनच शहरभर या सभेची चर्चा, अंदाज, उत्सुकता वाढली होती आणि सायंकाळी सभेला मिळालेल्या प्रचंड गर्दीने संपूर्ण कर्जत हादरून गेले.

पवार सभास्थळी दाखल होताच ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या व्यासपीठावरुन बोलताना अजितदादांनी कोणतीही मुरवणूक न ठेवता विरोधकांवर झंझावाती हल्लाबोल केला.

“कर्जतचा विकास फक्त पोस्टरवर होत नाही; तो कामांमध्ये दिसला पाहिजे,” असा कडक टोला त्यांनी सुरुवातीलाच लगावला. मागील पाच वर्षांचे कामकाज, बकाल रस्ते, दूषित पाणीपुरवठा, कचऱ्याच्या समस्या—या सर्वांचा आढावा घेत त्यांनी विरोधी पॅनेलचे ‘विकास’चे दावे फोल ठरवले.

त्यांनी स्पष्ट शब्दांत मतदारांना आवाहन केले—

“या वेळेस कर्जतच्या भवितव्यासाठी मतदान करा. काम करणाऱ्यांना साथ द्या… फक्त निवडणुकीच्या वेळी दिसणाऱ्यांना घरी बसवा!”

यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

सभेत अजित पवारांनी उमेदवारांची जाणकारी, त्यांची विकासावरील बांधिलकी आणि प्रामाणिकपणा अधोरेखित केला. “अर्थसंकल्प वाढवण्यापासून ते प्रकल्प आणण्यापर्यंत—आमची टीम सक्षम आहे. कर्जतच्या विकासात आणखी वेग आणणे हेच आमचे लक्ष्य,” असे ते म्हणाले.

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी तिरकस चिमटा काढला—

“काही लोक निवडणूक आली की विकासाची भाषा बोलतात. वर्षभर गायब, आणि निवडणुकीत मात्र अचानक ‘भूमिकाधारक’ बनतात.”

सभेला आलेल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही सभा कर्जतच्या निवडणूक प्रचारातील ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उबाठा गटाचे नितीन दादा सावंत, शेकापचे ज्येष्ठ नेते विलास थोरवे, बंधुजी पाटील, महिला अध्यक्ष उमाताई मुंडे, उद्योजक भगवान शेठ भोईर, राजीव साबळे, माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई जोशी, एस.आर.पी. जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, श्रीखंडे, बाजीराव दळवी, आरपीआयचे हिरामण गायकवाड, मोहनशेट ओसवाल, पंकज पाटील, बाबूशेठ घारे, रामशेठ राणे, नारायण डामसे, अॅड. गोपाल शेळके, निलेश घरत, महिला अध्यक्षा रंजनाताई धुळे, तसेच मधुराताई, पुष्पा हरिचंद्र दगडे, अजय सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.