ख्राइस्टचर्च: १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अवघ्या ६९ धावांत खुर्दा करून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारतानं पाकिस्तानवर तब्बल २०३ धावांनी विजय मिळवला. आता विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार आहेत.

वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त फार्मात असलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २७२ धावा केल्या. भारताच्या पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा या सलामीच्या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ८९ धावांची भागिदारी केली. १६ व्या षटकात पृथ्वी शॉ ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर कालराही ४७ धावा करून तंबूत परतला. मात्र, मैदानात उतरलेल्या शुबमन गिल यानं टिच्चून फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्यानं १०२ धावांची सुरेख खेळी केली. मात्र, दुसरीकडे भारतीय फलंदाजीची पडझड सुरू होती. देसाई, पराग, अभिषेक शर्मा हे स्वस्तात बाद झाले. त्यांच्यानंतर मैदानात उतरलेल्या ए. एस. रॉय याने गिलला चांगली साथ दिली. त्यानं ३३ धावांचं योगदान दिलं. या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर २७३ धावांचं आव्हान ठेवलं.

पाकिस्तानच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी मैदानात फार काळ तग धरू दिला नाही. भारतीय गोलंदाज आय. सी. पोरेल यानं सुरुवातीलाच पाकिस्तानला इमरान शाह आणि मुहम्मद झैद आलम यांच्या रुपानं धक्के दिले. या धक्क्यांतून पाकिस्तानची फलंदाजी सावरलीच नाही. पाकिस्तानच्या रोहेल नाझीर यानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही परागनं तंबूत धाडलं. फलकावर अवघ्या ३७ धावा असताना पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर पाकिस्तानची पडझड सुरूच राहिली. भारताकडून पोरेलनं सर्वाधिक चार विकेट घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here