मुंबई:’कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धीवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची मतं प्रत्येकाला पटतीलंच असं नाही. त्यावर मत-मतांतरं होऊ शकतात. ते सगळं व्हायलाही हवं. मात्र, आता चर्चा करण्याऐवजी विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत,’ अशी खंत ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मांडलंय.
‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ‘पद्मावत’वरून झालेल्या रणकंदनाबद्दल बोलताना पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला खरा परंतु, त्यासाठी मोठमोठे खुलासे द्यावे लागले. तुम्हाला स्वत:च्या एखाद्या कलाकृतीसाठी उत्तरं द्यावं लागणं यापेक्षा दुसरी दु:खद गोष्ट नाही, असं म्हणत भन्साळींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला.
‘एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे खुलासे करत बसावे लागतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मला चांगली जाण आहे. मी एक जबाबदार चित्रपट निर्माता आहे. काही मूठभर लोकांना पटत नाही म्हणून मी खुलासे का छापायचे, असा प्रश्न मला अनेकदा सतावतो. मी सेन्सॉर बोर्डाला खूश करू की सरकारचं समाधान करू? किती जणांची मर्जी राखू? मी माझ्या देशातील चित्रपट रसिकांसाठी जबाबदारीनं एक चित्रपट बनवलाय, मग माझ्यावर खुलासे करण्याची वेळ का यावी? हा माझ्या प्रामाणिकपणावर आघात होता. मला ज्यावेळी खुलासा देणारा व्हिडिओ प्रदर्शित करावा लागला तो क्षण माझ्यासाठी प्रचंड त्रासदायक होता. मला निराशेच्या खोल गर्तेत ढकलल्यासारखं वाटत होतं, पण मला त्या गर्तेतून उठून आकाशाला गवसणी घालायची होती. मी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेले सगळे सकारात्मक क्षण गोळा केले आणि पुन्हा उभा राहिलो. कारण, मला या सगळ्यातून सावरून पुढं जायचं होतं.’ असं म्हणत भन्साळींना आपलं मन मोकळं केलं.