पालघर- पालघरमधील भाजपचे खासदार, अॅड. चिंतामण वनगा यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चिंतामण वनगा नवी दिल्लीत आले होते. कालपासूनच त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. आज पुन्हा त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना सकाळी साडे दहा वाजता तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

वनगा हे उच्च विद्याविभूषित होते. वकील असलेल्या वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी काम केलं आहे. १९९० ते १९९६ पर्यंत भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते. २००९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here