कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. न्यायालयाने तावडेला कोल्हापूरमध्ये येण्यास मज्जाव केला असून पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, तसेच दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी, या अटींवर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी तावडेच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित आरोपी तावडे यानेच रचला असून त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. तोच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने तावडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं त्याला पानसरे हत्या प्रकरणातही जामीन देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली होती. तर एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि त्याच्याविरोधात खोटे पुरावे गोळा करायचे. तसं तपास यंत्रणेनं तावडेच्या बाबतीत केलं आहे. त्याला जाणूनबुजून अडकवले आहे, अशी बाजू तावडेच्या वकिलांनी मांडली होती. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तावडेच्या जामीन अर्जावर ३० जानेवारीला निकाल देण्यात येईल, असं सांगितलं होतं. न्यायालयानं आज तावडेच्या जामीन अर्जावर निकाल दिला. त्याला सशर्त जामीन मंजूर केला. कोल्हापूरमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये आणि दर शनिवारी विशेष पथकासमोर हजेरी लावावी, असे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here