उद्या मुंबई बरोबर संपुर्ण महाराष्ट्र पल्स पोलिओ लसीकरण.
5 दिवसांच्या पल्स पोलिओ मोहिमेत हजार कर्मचारी देणार पोलिओची लस.
नीलम खरात प्रतिनिधी
मुंबई:- देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रविवार, 31 जानेवारी रोजी 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुंबई बरोबर महाराष्ट्रातील लाखो बालकांना राष्ट्रीय पल्स पोलिओचा डोस पाजण्याची मोहीम घेण्यात येणार आहे. मुंबई शहर व महाराष्ट्रातील जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली.
पल्स पोलिओ मोहिमेत बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी मुंबई बरोबर संपुर्ण महाराष्ट्र भर लाखो बुथ स्थापन करण्यात आले असून, सकाळी 5 ते सायंकाळी 5 या वेळेत कर्मचारी बालकांना डोस पाजविणार आहेत.
याव्यतिरिक्त हजारो ट्रान्झीट युनिट व हजारो मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कर्मचारी अशी लाखो अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत राहणार आहे. रविवारी डोस न घेतलेल्या बालकांना 1 ते 4 फेब्रुवारीदरम्यान डोस देण्यात येणार आहे. या काळात घरोघरी, वाडीवस्ती, वीटभट्टी, ऊसतोड टोळींतील बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. सर्व पालकांनी आपल्या घरातील व शेजारील बालकांना केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन महाराष्ट्रातील आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
देशातून पोलीओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 1995-96 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात पाच वर्षांच्या आतील बालकांना आजारी किंवा नवीन जन्म असेल तरीही पोलिओ लसीची अतिरिक्त मात्रा ठरावीक अंतराने देणे यालाच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम असे म्हटले जाते.
