नागपूरचा भाजप नेता गोतस्करीच्या रॅकेटमधील मुख्य आरोपी, बालाघाट  मधून नेऊन नागपूरमध्ये गाय, बैलांची कत्तल करण्यात येणार होती.

नागपूर:- कत्तलीसाठी गोवंशांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा मध्य प्रदेश पोलिसांनी पदार्फाश केला आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करत 10 जणांना अटक केली आहे. गोवंशांना कत्तलीसाठी नागपूरच्या जिल्ह्यात नेलं जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव गोतस्करी करणाऱ्या रॅकेटचा म्होरक्या असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 165 गायी आणि बैलांची मध्य प्रदेशातल्या बाकोडा गावातून तस्करी केली जात होती. हा भाग जंगल परिसरात येतो. नागपूरमध्ये नेऊन गाय, बैलांची हत्या करण्यात येणार होती. याची माहिती मिळताच लालबुरा पोलीस ठाण्याचं गस्ती पथक बाकोडा इथं पोहोचलं. यावेळी गायींची वाहतूक करणारे पोलिसांना मद्यधुंद अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे गायी-गुरांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही प्रमाणपत्रं नव्हती.

गायींची वाहतूक करणाऱ्यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ही जनावरं भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता मनोज पारधीची असल्याची माहिती त्यांनी दिली. पारधी आणि पाठक यांनी गायी-गुरांना कत्तलीसाठी नागपूरला नेण्यास सांगितलं असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं. यानंतर पोलिसांनी 10 जणांना घटनास्थळावरून अटक केली. त्यानंतर एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मनोज पारधी आणि अरविंद पाठक यांचा हात असल्याचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती लालबुरा पोलीस ठाण्याच्या रघुनाथ काटरकर यांनी दिली.

या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वैभव पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही या प्रकरणात लक्ष घालू, असं त्यांनी सांगितलं. ‘मला नुकतीच या घटनेची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील सत्य समोर आल्यावर पुढील कार्यवाही करू,’ असं पवार म्हणाले. रस्त्यांच्या माध्यमातून होणारी गायी-गुरांची तस्करी रोखल्यानंतर आता तस्कर जंगलांचा आधार घेत असल्याचं पोलीस अधिकारी रघुनाथ काटरकर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here