गडचिरोली पोलिस वसाहतीत महिला पोलीस शिपाईची विष प्राशन करून आत्महत्या
*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*
*गडचिरोली* : पोलिस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलीस शिपाई हिने रात्रीच्या १०.३० वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिला पोलीस शिपाईचे नाव प्रणाली काटकर (३५) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महिला पोलीस शिपाई गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलीस शिपाई संदीप पराते यांच्याशी दोन वर्षांआधी झाले असून तेसुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. मृतक महिला पोलीस शिपाई ही संदीप पराते यांची दुसरी पत्नी आहे. या दोघात सातत्याने वाद होत असल्याने काल २९ जानेवारी रोजी कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने मृत महिला पोलीस शिपाई हिने टोकाची भूमिका घेऊन विषप्राशन केले. त्यावेळी पती संदीप पराते यांना पत्नी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच उपचारार्थ शासकीय रुग्णालय गडचिरोलीत हलविण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले.
सदर घटने ठिकाणी रात्रीच्या वेळीच गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी रुग्णालयात पोहचून अधिक तपास सुरू आहे. आज ३० जानेवारीला शवविच्छेदन करण्यात येत आहे. सदर महिला पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याने पोलिस वसाहतीत सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. तर सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम गोऱ्हे करीत आहेत.