मुंबई: रिपब्लिकन पक्ष खोरीपाने मुंबईत लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. देवाश खोब्रागडे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. भाऊ निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भास्कर केदारे यांची मुंबई प्रदेश संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा सोहळा मुंबई जिल्हाध्यक्ष मा. भगवतजी कांबळे आणि मुंबई जिल्हा सचिव मा. विक्रांतजी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रकाश भास्कर केदारे हे आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नेतृत्व असून, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळवता येईल, असा पक्षाचा विश्वास आहे.
आपल्या नियुक्तीनंतर केदारे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आणि सांगितले, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे कर्तव्य आहे. पक्ष संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा आवाज बुलंद करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. समाजाच्या समस्या सोडवणे आणि तळागाळातील लोकांसाठी काम करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
या नियुक्ती सोहळ्यात मुंबई प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे मुंबई जिल्हाध्यक्ष मा. भगवतजी कांबळे यांनी सांगितले की, “प्रकाश भास्कर केदारे यांचे कार्यक्षेत्रातील अनुभव आणि आंबेडकरी विचारधारेशी निष्ठा पक्षाला पुढे नेण्यास मदत करतील.”
मुंबई जिल्हा सचिव मा. विक्रांतजी पाटील यांनी केदारे यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी केदारे यांचे योगदान निर्णायक ठरेल.”
मुंबईतील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आंबेडकरी विचारांचे बळकटीकरण करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई प्रदेश संघटक सचिव या जबाबदारीसाठी प्रकाश भास्कर केदारे यांना राज्यभरातून आंबेडकरी जनतेकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.