भिवंडी कोव्हिड -19 चा बनावट रिपोर्ट लॅबच्या तीन इसमांना रंगेहात पकडण्यात आले.
कोव्हिड-19 ची तपासणी करीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोव्हिड -19 चा निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट रिपोर्ट देताना महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरी मधील तीन इसमांना रंगेहात पकडण्यात आले.
✒अभिजीत सकपाळ,भिवंडी प्रतिनिधी✒
भिवंडी,दि.30 एप्रिल:- शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट पोसिटिव्ह व निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून अवघ्या 500 रुपयात विकणाऱ्या पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून गुरुवारी गुन्हे शाखेने सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात माहिती दिली आहे.
भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांना गोपनीय माहीती प्राप्त झाली होती की, भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोनाचे निगेटीव्ह तसेच पॉझीटीव्ह बनावट रिपोर्ट 500 रुपये दराने बनवून दिला जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लागताच मंगळवारी भिवंडी युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भिवंडी मनपाचे वैद्यकिय अधिकारी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोर असलेल्या महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे पोलीसांनी डमी व्यक्ती कोवीड-19 चे निगेटीव्ह रिपोर्ट घेण्याकामी पाठविले असता आरटीपीसीआर तपासणीकरीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोवीड-19 चा निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट रिपोर्ट देताना महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरी मधील तीन जणांना रंगेहात पकडण्यात आले.
यावेळी महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-19 या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण 64 इसमांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये 59 रिपोर्ट हे निगेटीव्ह व 5 रिपोर्ट हे पॉझीटीव्ह मिळून आले असून या बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांचे कडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचे 64 इसमांचे कोवीड- 19 आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हे लॅब मध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटर च्या सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याचे कबुली दिली.