वादळी वाऱ्याचा कहर; जांभूळ गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उध्वस्त, बौद्धवाडीत घरांचे मोठे नुकसान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने पाहणी; सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी
निखिल सुतार
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133
म्हसळा : – म्हसळा तालुक्यातील जांभूळ गावावर वादळी वाऱ्याने थैमान घातले असून, त्यामुळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पूर्णतः उध्वस्त झाले आहे. यासोबतच बौद्धवाडीत दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून, घरावरील कौले व पत्रे उडून गेले आहेत. परिणामी, घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू भिजून खराब झाल्या आहेत.
या आपत्तीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना विभागाच्या वतीने घटनास्थळी भेट देण्यात आली. या पाहणी दौऱ्यात युवासेना तालुका अधिकारी श्री. कौस्तुभ विलास करडे, शिवसेना तालुका प्रमुख श्री. सुरेश कुडेकर, तसेच कडवट शिवसैनिक श्री. नरेश विचारे हे उपस्थित होते. गावचे सरपंच श्री. मोरे हेही यावेळी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान सरपंच व ग्रामस्थांकडून नुकसानीची माहिती घेण्यात आली, तसेच पंचनामा झाला की नाही, कोणत्या अधिकाऱ्यांनी तो केला याची चौकशी करण्यात आली.
शिवसेना युवासेनेच्या वतीने राज्य शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे की, सदर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर सुसज्ज व कार्यक्षम अवस्थेत पुन्हा उभारण्यात यावे. गावाच्या आरोग्यदृष्ट्या हे केंद्र अत्यावश्यक आहे.
दरम्यान, बौद्धवाडीत वादळामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, दरवर्षी या भागात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे ग्रामस्थांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे या भागासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दोन घरांतील संपूर्ण अन्नधान्य भिजून खराब झाल्यामुळे, युवासेनेच्या वतीने त्या दोन्ही कुटुंबांना तत्काळ अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, तातडीची मदत जाहीर करावी, तसेच स्थानिक प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून योग्य तो अहवाल सादर करावा, अशी ठाम मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.