पुरुषांनंतर आता महिलांचीही फसवणूक
अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे पोलिसांचे आवाहन

अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे पोलिसांचे आवाहन
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा : 30/06/2021सध्या नागरिकांना गंडा घालण्यासाठी सेक्सटॉर्शन हा नवीन फंडा भामट्यांनी सुरू केला आहे. आतापर्यंत पुरुषांच्या अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या असून, आता तर चक्क महिलांच्या फेसबुक मेसेंजरवर त्याच महिलेचे फोटो मोर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनो, आता अनोळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे
फेसबुकवरून सुंदर मुली चॅटिंग करून त्यानंतर थेट व्हॅट्सऍपद्वारा नग्न व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग करतात. ती रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करीत पैसे उकळतात. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सायबर भामट्यांकडून सुरू आहे. पुरुषांना गंडविल्याच्या अशा अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, आता चक्क महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यांचे फोटो माॅर्फ करून ते अश्लील छायाचित्र महिलेच्या मेसेंजरवर टाकून पैसे उकळण्याचा धंदा सुरू झाला आहे. त्यामुळे पुरुषच नव्हेतर, आता महिलांनीदेखील सावध राहण्याचे आवाहन वर्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कस्टमर केअर क्रमांक शोधणे पडू शकते महागात
काही कारणास्तव कस्टमर केअरशी संपर्क करण्याचे काम पडल्यास गूगलवर हा क्रमांक सर्च करण्याची सवय असते. मात्र, ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण हॅकर्स आणि सायबर भामट्यांनी गूगलवर अनेक बनावट हेल्पलाइन क्रमांक अपलोड करून ठेवले आहेत. या क्रमांकांवर कॉल केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.
पोलिसांकडून करण्यात आले आवाहन
फेसबूक, व्हॉट्सऍप व इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून मुलींचा फोटो वापरून बनावट अकाउंटवरून आपल्या सोबत मैत्री करून व्हॉट्सऍपद्वारा किंवा फेसबुक मेसेंजरद्वारा व्हिडिओ कॉल करून अश्लील प्रकारचे कृत्य करण्यास भाग पाडून आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो व तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. असे अनेक प्रकार पुरुषांसोबत घडले असून, आता महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांनादेखील पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच मेसेज, ईमेल आदींवर प्राप्त होणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका, स्वत:ची वैयक्तिक माहिती देऊ नका, असे आवाहन वर्धा पोलीस तसेच सायबर सेलकडून करण्यात येत आहे.”